आरोग्य

Snake Bite To Animal: जनावरांना कोणत्या प्रजातीचा साप चावल्याने कोणती लक्षणे दिसतात? वाचा महत्त्वाची माहिती

Snake Bite To Animal:- पाळीव प्राण्यांना म्हणजेच गाई किंवा म्हशी व इतर जनावरांना देखील सर्पदंश झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. बऱ्याचदा जेव्हा जनावरे चरायला बाहेर जातात तेव्हा अशाप्रसंगी अशा घटना मोठ्या प्रमाणावर होतात. त्यामुळे जर जनावरांना सर्पदंश झाला तर पटकन वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे असते.

परंतु वैद्यकीय मदत तात्काळ मिळणे अगोदर प्रथमोपचार देखील महत्त्वाचे असतात. ह्या अनुषंगाने जर आपण पाहिले तर भारतामध्ये जर आपण विषारी प्रजातीच्या सापांचा विचार केला तर यामध्ये नाग, फुरसे तसेच मन्यार व घोणस सारख्या प्रजाती आढळून येतात. या सर्व प्रजातींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विष असते

व ते जनावरांना हानिकारक ठरते. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये देखील सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर आढळतात. या दृष्टिकोनातून जर आपण पाहिले तर हे जे काही सापांच्या प्रजाती आहेत त्यांनी दंश केल्यानंतर दिसणारे लक्षणे देखील वेगळ्या पद्धतीचे असतात. त्या अनुषंगाने या लेखांमध्ये आपण कोणत्या प्रजातीच्या सापांनी दंश केल्यावर जनावरांमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात? याबद्दल माहिती घेणार आहोत.

 जनावरांना कोणत्या पद्धतीचा साप चावल्याने कोणती लक्षणे दिसतात?

1- नाग नाग प्रजातीच्या सापामध्ये जनावरांच्या मेंदू आणि हृदय या अवयवांना इजा होईल या प्रकारचे विष असते. जर नागाने दंश केला तर बाधित जनावरांमध्ये दंश केलेल्या जागेवर सूज येते व तोंडातून लाळ गळते. तसेच अर्धांग वायू सदृश्य लक्षणे दिसायला लागतात व जनावरांचा तोल जातो. योग्य वेळेमध्ये उपचार मिळाले नाही तर जनावरे श्वसन संस्थेच्या अर्धांगवायुने मृत्यू पावतात.

2- मण्यार या जातीच्या सापामध्ये जनावरांची मज्जा संस्था व रक्ताशी निगडित अवयवांना इजा करणारे विष असते. या जातीच्या साप चावल्यानंतर जर वेळेवर उपचार मिळाले नाही तर जनावरांना श्वसनसंस्थेचा अर्धांगवायुही होतो व जनावरे मरतात.

ज्या ठिकाणी दश केलेला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सूज येते. जनावरांचा श्वसनाचा वेग वाढतो व रक्तस्राव व्हायला लागतो. त्यासोबतच ताप येणे व अशक्तपणा नंतर जनावरे बसून राहणे अशी लक्षणे दिसतात.

3- फुरसे आणि घोणस या प्रजातींच्या सापांच्या विषामध्ये रक्त गोठवणे थांबवणारे तसेच रक्तातील लाल पेशींना इजा करणारे व रक्तस्राव करणारे विषारी घटक असतात. जनावरांच्या शरीरावर ज्या ठिकाणी या जातीच्या सापाने दंश केलेला असतो त्या ठिकाणाहून रक्तस्राव होणे तसेच पायावर दंश झाल्यास मोठ्या प्रमाणावर वरच्या दिशेने सूज चढत जाणे,

तीव्र स्वरूपात वेदना होणे तसेच अस्वस्थ वाटणे, चालताना लंगडणे आणि खाणे पिणे मंदावणे इत्यादी लक्षणे दिसतात. जर तोंडाच्या भागांमध्ये दंश केला असेल तर तोंडावर जास्त सूज येते होती व खालच्या बाजूला असेल तर श्वास घ्यायला त्रास होतो. याप्रसंगी योग्य उपचार मिळाले नाही तर जनावर दगावू शकते.

याशिवाय रक्त गोठवणाऱ्या ज्या काही पेशी असतात त्यांच्या संख्या कमी होते व उपचारास वेळ लागला तर जनावरांना मध्ये विविध अवयवातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊ शकतो. रक्त मिश्रित शेण तसेच लघवी  इत्यादी माध्यमातून रक्तस्राव होऊन जनावरांमध्ये रक्तक्षय होतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts