Colorectal Cancer : कोलोरेक्टल कर्करोग हा गुदाशय आणि कोलन पेशींची जास्त प्रमाणात वाढ झाल्यामुळे होतो. याला मोठ्या आतड्याचा कर्करोग असेही म्हणतात. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लक्षणे दिसून येत नाहीत,
जसजसा कर्करोग वाढत जातो तसतसे आतड्यांच्या सवयींमध्ये बदल दिसू लागतात जसे की, अतिसार किंवा बद्धकोष्ठता, ओटीपोटात दुखणे किंवा क्रॅम्पिंग जे चटकन बरे होत नाही, अचानक वजन कमी होणे आणि विष्ठेवाटे रक्त येणे.
कोलोरेक्टल कर्करोग होण्याचा धोका
तरुणांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब ठरत आहे, ज्याच्या प्रसाराला अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे जीवनशैलीत झालेला बदल, ज्यामध्ये आहाराच्या चुकीच्या सवयी,
प्रक्रिया केलेले अन्न, आहारात फायबरची कमतरता आणि बैठी जीवनशैली यांचा समावेश आहे, ज्यामुळे लहान वयात कोलोरेक्टल कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो.
वाढलेले वजन कारणीभूत
तरुणांमधील लठ्ठपणाचे वाढते प्रमाण हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, कारण शरीराचे वाढलेले वजन कोलोरेक्टल कर्करोगास कारणीभूत ठरते. संशोधनानुसार, शरीरातील अतिरिक्त चरबी, विशेषतः पोटाभोवती असलेली चरबी कोलन आणि गुदाशयामध्ये कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस कारणीभूत ठरते.
आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे अनुवांशिकता. अल्कोहोलचे सेवन, मधुमेह, कमी झालेली शारीरिक हालचाल आणि काही विषारी पदार्थ किंवा प्रदूषणाच्या संपर्कात येणे यासारखे पर्यावरणीय घटक देखील तरुणांमधील कोलोरेक्टल कर्करोगाच्या विकासास कारणीभूत ठरू शकतात.
कोलोरेक्टल कॅन्सरपासून बचाव कसा कराल?
कोलोरेक्टल कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी निरोगी जीवनशैली आणि नियमित तपासणी आवश्यक आहे. फळे, भाज्या आणि तृणधान्यांचा आहारात समावेश केल्यास कोलोरेक्टल कर्करोग होण्याचा धोका कमी करू शकतात. वजन नियंत्रित राखणे,
शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे आणि जास्त प्रमाणात मद्यपान टाळणे या गोष्टी या आजाराची शक्यता कमी करण्यास हातभार लावतात.
उपचार कोणते?
उपचार हे व्यक्तीनुसार भिन्न असतात आणि ते डॉक्टरांद्वारे ठरवले जातात. कर्करोगाचा सामना करण्यासाठी आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे.