Health Tips In Marathi : स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या शरीरावर आक्रमण करून त्यास इजा करू लागते, तेव्हा संधिवात होतो. संधिवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, हा सामान्यपणे आढळणारा वातरोग आहे. नियमित व्यायाम केल्यास सांधेदुखीवर मात करता येते.
संधिवातामध्ये दाह आणि तीव्र वेदना, स्नायूंमधील कडकपणा एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन कार्यात अडथळे निर्माण करतो. अगदी सामान्य क्रियादेखील आव्हानात्मक ठरतात. जसे की सकाळी अंथरुणातून बाहेर पडून चालत जाणे, दार उघडणे अशा सामान्य क्रिया देखील त्रासदायक ठरू शकतात.
संधिवात हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक पैलूवर, त्याच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम करतो. तीव्र वेदनेसह जगताना नैराश्य, एकटेपणा यासारख्या भावना निर्माण करते.
दैनंदिन कार्यासाठी सतत इतरांवर अवलंबून राहणेदेखील एखाद्याचा स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची भावना कमी करू शकते. म्हणूनच सांधेदुखीच्या रुग्णांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दररोज न चुकता व्यायाम करावा जेणेकरून त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
व्यायामाचे फायदे
नियमित व्यायामामुळे केवळ सांध्याचे कार्य सुधारण्यास मदत होत नाही तर स्नायूंचा कडकपणा कमी होतो आणि वेदना आणि थकवा दूर होण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या आवडीचे काम करू शकता.
स्नायूंची गतिशीलता आणि लवचिकता सुधारण्यास मदत होते. शारीरिक हालचाल वाढवण्यासाठी जमेल तितके सक्रिय राहाणे गरजेचे आहे. चालणे, पोहणे आणि सायकल चालवणे, एरोबिक्स व्यायाम केल्याने हृदय तसेच फुफ्फुसाची बळकटी वाढते, ज्यामुळे सहनशक्ती वाढते आणि एकूणच आरोग्य सुधारते.
जॉगिंगसारखे जास्त शारीरिक क्षमतेचे व्यायाम टाळून, कमी तीव्रतेचे व्यायाम करावेत. सांध्यावर ताण येणार नाही अशा व्यायामाची निवड करावी. जर तुम्हाला सांधेदुखी सारखी लक्षणे जाणवत असतील तर स्ट्रेंथनिंग वर्कआऊट्स करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. स्नायूंना बळकटी आणण्यासाठी योगसाधना हा एक उत्तम पर्याय आहे.