7th Pay Commission:- यावर्षीची दिवाळी ही केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांकरिता खूप मोठी भेट देणारी ठरली असून याच कालावधीमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सरकारच्या माध्यमातून वाढवण्यात आला व जणू काही दिवाळीची गिफ्ट कर्मचाऱ्यांना सरकारच्या माध्यमातून देण्यात आले.
आपल्याला माहित आहेच की, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली व याविषयीची मागणी आणि प्रतीक्षा बऱ्याच दिवसापासून कर्मचाऱ्यांना होती. सरकारच्या माध्यमातून चार टक्के महागाई भत्ता वाढ केल्यामुळे अगोदर मिळणारा 42 टक्के महागाई भत्ता हा आता चार टक्के वाढ झाल्यामुळे 46 टक्के झालेला आहे.
एवढेच नाही तर ही चार टक्क्यांची महागाई भत्त्यातील वाढ एक जुलै 2023 पासून कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच या कालावधीतील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. हा एक महत्त्वाचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला परंतु आगामी वर्षांमध्ये म्हणजेच येणाऱ्या काही महिन्यानंतर सरकारच्या माध्यमातून आणखी काही निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला जाण्याची शक्यता आहे. जर हे निर्णय घेतले गेले तर कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये मोठी वाढ होणार असे देखील माहिती समोर येत आहे.
सरकारच्या माध्यमातून घेतले जाणार हे निर्णय
1- महागाई भत्ता परत वाढेल– यातील पहिला निर्णयाचा विचार केला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येणाऱ्या नवीन वर्षांमध्ये आणखी एकदा महागाई भत्तावाढीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ केली जाणार असून आताच्या 46% महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ जर केली तर तो 50% पर्यंत वाढणार आहे. साधारणपणे 2024 पासून ही वाढ लागू होण्याची शक्यता आहे.
2- प्रवासी भत्यात देखील होईल वाढ– महागाई भत्ता सोबतच कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला टीए अर्थात प्रवासी भत्ता देखील वाढवला जाण्याची शक्यता आहे. आपण प्रवासी भत्त्याचा विचार केला तर तो वेगवेगळ्या प्रकारच्या पे बॉण्डशी जोडलेला आहे. म्हणजे साधारणपणे त्याचे स्वरूप पाहिले तर उच्च दर्जाच्या टीपीटीए शहरांमध्ये ग्रेड एक ते दोन साठी प्रवासी भत्ता अठराशे रुपये आणि 1900 रुपये आहे व ग्रेड तीन ते आठ पर्यंत तो तीन हजार सहाशे रुपये अधिक डीए असा मिळतो. इतर ठिकाणी प्रवासी भत्ता हा रुपये 1800 अधिक महागाई भत्ता म्हणजे डीए एवढा आहे.
3- घरभाडे भत्त्यात होईल वाढ– घर भाडेभत्त्यामध्ये देखील वाढ होण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून पुढच्या वर्षी घरभाडे भत्त्यात सुधारणा केली जाण्याची शक्यता आहे. एचआरए अर्थात घर भाडेभत्त्यात तीन टक्क्यांची वाढ होईल असा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे. साधारणपणे जेव्हा महागाई भत्ता 50% ची पातळी ओलांडेल तेव्हा घरभाडे भत्ता हा वाढवला जाईल.
कर्मचाऱ्यांना दिला जाणारा घर भाडे भत्ता हा त्यांच्या राहण्याचे ठिकाणानुसार म्हणजेच एक्स, वाय आणि झेड अशा श्रेणीनुसार विभागण्यात येतो. सध्या एक्स श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 27%, वाय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 18% आणि झेड श्रेणी मधील कर्मचाऱ्यांना नऊ टक्के घरभाडे भत्ता दिला जात आहे. यामध्ये आता तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
साधारणपणे हे तीनही महत्वाचे निर्णय मार्च 2024 पर्यंत घेतले जाण्याची शक्यता असून तसा दावा देखील अनेक मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. दुसरी जमेची बाजू म्हणजे लोकसभेच्या निवडणुका देखील पुढील वर्षी होऊ घातल्यामुळे हे तीनही निर्णय मार्च महिन्याच्या पूर्वीच घेतले जातील असे देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.