भारत

Chandrayaan-3 : भारताचे चांद्रयान ३ मिशन यशस्वीपणे लॉन्च! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय शोधणार? किती अवघड आहे हे मिशन, चला जाणून घेऊया…

Chandrayaan-3 : भारताकडून चांद्रयान ३ हे मिशन आज यशस्वीपणे लॉन्च करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन सेंटर येथून दुपारी 2.35 वाजता लॉन्च करण्यात आले आहे. भारताचे हे यान ४० दिवसांनी चंद्रावर उतरणार आहे.

भारताची ही चंद्रावर जाण्यासाठीची तिसरी मोहीम आहे. भारताकडून त्यांची ही तिसरी चांद्रयान मोहीम यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अनेक देशांनी उतरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आजपर्यंत कोणीही यशस्वी झाले नाही. जर भारतचे हे मिशन पूर्णपणे यशस्वी झाले तर भारत असा करणारा पहिला देश ठरणार आहे.

एवढेच नाही तर चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर उतरवणारा हा चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीन चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले आहेत.

भारताकडून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २०१९ मध्ये देखील लँडर उतरवण्याचा प्रयत्न केला होता मात्र शेवटच्या क्षणी तो अयशस्वी झाला होता. मात्र त्यामधील काही चुकांचा धडा घेऊन भारताकडून आज पुन्हा एकदा याच ठिकाणी लँडर मिशन लॉन्च करण्यात आले आहे. 23 किंवा 24 ऑगस्टला चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भारताकडून ४० दिवसांमध्ये हे मिशन पूर्णपणे यशस्वी केले जाणार आहे. अमेरिका आणि चीनसह जगाच्या नजरा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहेत. काही वर्षांपूर्वी चीनने दक्षिण ध्रुवापासून काही अंतरावर लँडर उतरवले होते. इतकंच नाही तर अमेरिका पुढच्या वर्षी दक्षिण ध्रुवावर अंतराळवीर पाठवण्याच्या तयारीत आहे.

दक्षिण ध्रुव का?

सर्व देशांच्या नजरा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच का आहेत? असा देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल. पृथ्वीवरील दक्षिण ध्रुव अंटार्क्टिका हा सर्वात थंड प्रदेश आहे. तसेच चंद्राचा दक्षिण ध्रुव देखील सर्वात थंड भाग आहे.

चंद्राचा दक्षिण ध्रुवाचा बहुतांश भाग सावलीत राहतो या ठिकाणी सूर्याची करणे तिरपी पडत असतात. त्यामुळे येथील तापमान खूपच कमी असते. त्यामुळे येथील भाग खूपच थंड असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणच्या कमी तापमानामुळे या ठिकाणी पाणी आणि खनिजे असण्याचा दावा करण्यात येत आहे.

पाणी किंवा बर्फ जरी सापडला तरी त्याचे काय होणार?

चंद्राचा दक्षिण ध्रुव खूप रहस्यमय आहे. याबाबत जग अजूनही अनभिज्ञ आहे. नासाच्या एका शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे की दक्षिण ध्रुवावर बर्फ आहे आणि इतर नैसर्गिक संसाधने देखील असू शकतात हे आम्हाला माहित आहे. तथापि, हे अद्याप अज्ञात जग आहे.

नासाचे म्हणणे आहे की दक्षिण ध्रुवावरील अनेक खड्डे कधीच प्रकाशित झालेले नसल्यामुळे आणि त्यातील बहुतांश भाग सावलीतच राहत असल्याने तेथे बर्फ असण्याची शक्यता जास्त आहे.

चंद्राच्या या भागावर असलेले पाणी कोट्यवधी वर्षे जुने असू शकते असा तज्ज्ञांकडून दावा करण्यात येत आहे. जर चंद्राच्या या भागावर भारताकडून यशस्वीपणे लँडर उतरवण्यात आला तर या ठिकाणच्या वातावरणाचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.

जर चंद्रावर बर्फाचा शोध लागला तर सौरमालेत पाणी आणि इतर पदार्थ कसे फिरत आहेत याचा अभयास करणे शक्य होईल. उदाहरणार्थ, पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशातील बर्फाने आपल्या ग्रहाचे हवामान आणि वातावरण हजारो वर्षांमध्ये कसे विकसित झाले हे उघड केले आहे.

जर पाणी किंवा बर्फ सापडला तर ते पिण्यासाठी, थंड करण्यासाठी उपकरणे, रॉकेट इंधन तयार करण्यासाठी आणि संशोधन कार्यासाठी वापरले जाऊ शकते.

तिथे पोहोचणे किती अवघड आहे?

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा अनेक देशनकडून प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र कोणाचीही मोहीम यशस्वी झाली नाही. कारण या ठिकाणी लँडर उतरवणे शक्य नाही. या ठिकाणी काळोख असल्याने तसेच येथील जागा खूपच अवघड असल्याने याठिकाणी उतरणे शक्य नाही.

नासाचे असेही म्हणणे आहे की आपण कितीही प्रगत तंत्रज्ञान वापरले आणि लँडर कितीही प्रगत असले तरीही दक्षिण ध्रुवाची जमीन कशी दिसते हे सांगणे कठीण आहे. आणि वाढत्या आणि घसरलेल्या तापमानामुळे काही यंत्रणा खराबही होऊ शकतात. नासाकडून पुढील वर्षी या ठिकाणी अंतराळवीर पाठवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चांद्रयान-३ चा उद्देश काय आहे?

भारताकडून चांद्रयान ३ ही मोहीम सुमारे 615 कोटी रुपये खर्चून पाठवण्यात आली आहे. या मोहिमेमागचे उद्देश असे आहे की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडिंग करणे आणि त्या ठिकाणच्या वातावरणाचा अभ्यास करणे.

इस्रोच्या मते, चांद्रयान-3 ची तीन उद्दिष्टे आहेत. पहिले- चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचे सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग. दुसरे- चंद्राच्या पृष्ठभागावर चालणारे प्रज्ञान रोव्हर दाखवणे. आणि तिसरा – वैज्ञानिक चाचण्या घेणे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts