Changes From 1 April 2023 : देशाचे २०२२-२३ चे आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. १ एप्रिल २०२३ पासून देशाचे नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. पण १ एप्रिलपासून देशात अनेक बदल होणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशावर त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो.
१ एप्रिलपासून देशात नवीन नियम लागू केले जाणार आहेत. हे नवीन नियम सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत की त्यांच्यावर जास्तीचा आर्थिक बोजा पडणार याबद्दल सविस्तर जाणून घेऊया….
एप्रिलमध्ये इतके दिवस बँका बंद राहणार
आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँकांना बक्कळ सुट्ट्या आहेत. चालू आर्थिक वर्षात हा एक मोठा बदल आहे. त्यामुळे जर ग्राहकांना या महिन्यात बँकांसबंधित काही कामे असतील फटाफट उरकावी लागणार आहेत अन्यथा त्यांच्या आर्थिक कामांना उशीर लागू शकतो.
एप्रिल 2023 मध्ये असे 15 दिवस आहेत जेव्हा अनेक खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका शनिवार व रविवारसह सुट्ट्यांमुळे बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून बँकाच्या सुट्ट्यांची जाहीर करण्यात आली आहे.
सोने खरेदी करण्याच्या पद्धतीत बदल
1 एप्रिलपासून सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या नियमांमध्ये देखील बदल होणार आहे. सरकारने सांगितले आहे की, 1 एप्रिलपासून सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींच्या विक्रीला सहा अंकी अल्फान्यूमेरिक HUID (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) शिवाय परवानगी दिली जाणार नाही.
अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘1 एप्रिल 2023 पासून फक्त सोन्याचे दागिने HUID सोबत विकण्याची परवानगी दिली जाईल.’ ग्राहक व्यवहार विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी सांगितले की, ग्राहकांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 31 मार्चनंतर हॉलमार्क केलेले सोन्याचे दागिने आणि HUID शिवाय सोन्याच्या कलाकृतींच्या विक्रीला परवानगी दिली जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर वाढू शकतात
आर्थिक वर्षाच्या पहिल्याच वर्षात सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यामध्ये पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर वाढू शकतात. या महिन्यात पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे नवीन दर कंपन्यांकडून जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत
केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांना पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करण्यास सांगितले आहे. यासाठी सरकारकडून वेळोवेळी मुदत वाढवण्यात आली आहे. जर सरकारच्या नियमानुसार 31 मार्च 2023 पूर्वी दोन्ही ओळखपत्रे लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल. पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करणे अनिवार्य आहे.