Char Dham Yatra Latest Update : एप्रिल महिन्याच्या शेवटी चार धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दररोज हजारो भाविक चार धाम यात्रेसाठी जात आहेत. मात्र त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.
सतत हवामानात बदल होत असल्याने चार धाम यात्रेमध्ये अडथळा निर्माण होत आहे. तसेच सतत मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे भाविकांची गैरसोय होत आहे आणि प्रशासनाच्या अडचणी देखील वाढत आहेत.
चार धाम यात्रेला सुरुवात झाल्यानंतर भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मात्र आता तेथील वातावरण खराब झाल्याने केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आता चार धाम यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांनी हवामान विभागाच्या सल्ल्यानुसार यात्रा करावी.
२२ एप्रिलपासून यमुनोत्री आणि गंगोत्री यात्रेला सुरुवात झाली आहे. तर २५ एप्रिल रोजी केदारनाथ धामचे दरवाजे उघडले आहेत. तसेच २७ एप्रिल रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले आहेत.
सततच्या मुसळधार पावसामुळे भाविकांना केदारनाथ आणि बद्रीनाथला जाण्यासाठी थांबवण्यात आले आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाकडून चार धाम यात्रा थाबवण्यात आली आहे.
केदारनाथ धाममध्ये बर्फ पडत असल्याने अनेक भाविकांची प्रवासादरम्यान गैरसोय होत आहे. बर्फवृष्टी आणि पाऊस होत असल्याने भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पौरी एसएसपी श्वेता चौबे यांनी सांगितले की, बद्रीनाथ आणि केदारनाथमध्ये सतत बर्फवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे बद्रीनाथ आणि केदारनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंना श्रीनगर गढवालमध्ये थांबवण्यात आले आहे. प्रवाशांना हवामान स्वच्छ होईपर्यंत श्रीनगरमध्येच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
IMD ने अलर्ट जारी केला आहे
सततच्या बदलत्या हवामानामुळे उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी आणि मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते 1 मे ते 4 मे पर्यंत हवामान खराब राहील. केदारनाथ धाममध्ये सोमवारीही जोरदार बर्फवृष्टी झाली, त्यामुळे येथे थंडी वाढली आहे.
त्याचवेळी बर्फामुळे रस्ता बंद होण्याच्या भीतीने प्रवाशांना श्रीनगरमध्ये आधीच थांबवण्यात आले आहे. हवामान सुधारेपर्यंत प्रवाशांना पुढे न जाण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे.