India News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण विकासासाठी घेतलेला प्रत्येक निर्णय पंचायतराज व्यवस्थेला बळकट करणारा ठरला आहे. सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी गावपातळीवर झाल्यास ग्रामीण भागाच्या उत्कर्षाला दिशा मिळेल, असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय सरपंच महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर दत्तात्रय शेटे आणि उपाध्यक्ष पदावर बाळासाहेब जपे यांची निवड झाल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, सरपंच महासंघामुळे ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे सर्व कार्यकर्ते संघटीत झाले आहेत. घटनेमध्ये झालेल्या बदलानंतर देशात पंचायतराज व्यवस्थेचा स्विकार झाला. आज ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात अधिकार मिळाले. विकासाची गती अधिक वाढली आहे.
अनेक गावे या विकास प्रक्रीयेमुळे आदर्श झाली आहेत. विकासाचे मॉडेल या माध्यमातून पुढे आले. गावाचा विकास झाला, तरच देशाचा आणि राज्याचा विकास होऊ शकेल.
यासाठी महात्मा गांधींनी खेड्याकडे चला हा संदेश दिला. संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून गावाच्या विकासाचे महत्व पटवून दिले. त्याच विचाराने आज देशात पंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.
केंद्र सरकारने आज ग्रामीण विकासाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. पंचायतराज व्यवस्था ही विकासाचा प्राणवायू आहे. त्यादृष्टीनेच पंतप्रधान मोदींच्या प्रत्येक निर्णयात ग्रामीण विकासाचे प्रतिबिंब आहे.
ग्रामीण विकासाला गती मिळत असल्यामुळे शहर आणि गाव यातील दूरी कमी होत आहे. वेगवेगळ्या योजनांमधून रोजगाराच्या संधीही आता ग्रामीण भागात निर्माण होत असल्याने ग्रामीण भागाच्या विकासाला स्थैर्य प्राप्त होत असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.