Cyrus Mistry Death:टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि शापूरजी-पालनजी समूहाचे वारसदार सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, पालघरच्या चारोटी परिसरात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला.
या अपघातामध्ये सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर सूर्या नदीवरील पुलावर सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार दुभाजकाला धडकली.
या अपघातामध्ये मिस्त्री यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. तर सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. चालकाचे गाडीवर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच सायरस मिस्त्री यांचे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव आता टाटा रुग्णालयातून गुजरातमधील त्यांच्या घरी नेले जाणार आहे.
पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला.
अपघातात दोन जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. ही मर्सिडीज कार होती. गाडीचा क्रमांक MH-47-AB-6705 असा आहे.
पुढील प्रक्रिया सध्या सुरु आहे”. दुभाजकाला गाडीने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
सायरस मिस्त्री हे अब्जाधीश असलेल्या पालनजी शापूरजी यांचे ते पुत्र होत. त्यांनी टाटा ग्रुपला एका वेगळ्या वळणावर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.