अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- देशात कोरोना विरुद्धची लढाई आजही सुरु आहे. आजवर कोरोनामुळे अनेकांचे बळी गेले आहे. दरम्यान या महाभयंकर विषाणूला रोखण्यासाठी लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोना प्रतिबंधक दोन लसींना केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर लसीकरण कधी सुरु होणार याबाबत देशभरात चर्चा सुरु होती.
दोन टप्प्यात ड्राय रन घेण्यात आलं होतं. त्यानंतर आता 16 जानेवारीपासून प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. दुसर्या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त व तिसर्या टप्प्यात गंभीर आजाराने ग्रस्त 50 वर्षाखालील लोकांना लसी दिली जाईल. दुसर्या आणि तिसर्या टप्प्यात सुमारे 27 कोटी लोकांची लसीकरण होईल.
16 जानेवारीपासून देशात प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीकरणासंदर्भात शनिवारी उच्च स्तरीय बैठक बोलावली होती.
ज्यामध्ये लसीकरणाच्या अंतिम तारखेची घोषणा करण्यात आली. या बैठकीत कॅबिनेट सेक्रेटरी, पंतप्रधानांचे प्रधान सचिव व आरोग्य सचिव यांच्याव्यतिरिक्त इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.