LIC Scheme : अनेक पालकांना मुलींच्या पुढील भविष्याची चिंता लागून राहिलेली असते. त्यामुळे अनेकजण आता मुलींच्या भविष्यासाठी कुठे ना कुठे गुंतवणूक करत असतात. मात्र विना जोखीम तुम्ही सरकारी विमा कंपनी एलआयसीमध्ये गुंतवणूक करू शकता.
एलआयसीकडून गुंतवणूकदारांसाठी एक से बढकर एक योजना सादर केल्या जात आहेत. यामध्ये मुलींसाठी खास योजना आणल्या जात आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या लग्नासाठी या योजनेचा फायदा होऊ शकतो.
एलआयसीने मुलींसाठी कन्यादान योजना आणली आहे. या योजनेमध्ये पैसे गुंतवणूक करून तुम्ही लाखो रुपयांचा परतावा मिळवू शकता. तुम्ही या योजनेत 22 वर्षांसाठी प्रीमियम भरला तर 25 वर्षानंतर योजना परिपक्व होते आणि तुम्हाला 26 लाख रुपये मिळतील.
मुलीच्या नावावर खाते असते
मुलीच्या नावाने पॉलिसी घेण्यासाठी मुलीचे वय 1 वर्ष ते 10 वर्षे असायला हवे. मुलीची पॉलिसी असेल मात्र खाते वडिलांच्या नावे असेल. तसेच मुलीच्या वडिलांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 50 वर्षे असावे. तुम्ही प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक देखील भरू शकता.
प्रीमियमची रक्कम वाढवू किंवा कमी करू शकता
या पॉलिसीसाठी तुम्हाला फक्त रु.3600 चा मासिक प्रीमियम भरावा लागेल असे नाही. तुम्ही तुमच्या पॉलिसीमध्ये रक्कम वाढवू किंवा कमी करू शकता. तुमच्या प्रीमियमनुसार पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर हा लाभ मिळतो.
परिपक्वता फायदे
तुमची योजना पूर्ण झाल्यानंतर विम्याच्या रकमेसह, साध्या रिव्हिजनरी बोनसचा लाभ देखील मिळतो. याशिवाय अतिरिक्त बोनसचाही लाभ मिळतो. पॉलिसीवर ३ वर्षांनी कर्ज देखील मिळू शकते. प्रीमियम जमा केल्यावर 80C अंतर्गत वजावट उपलब्ध आहे आणि कलम 10D अंतर्गत परिपक्वता रक्कम करमुक्त आहे.
मृत्यूचे फायदे देखील समाविष्ट आहेत
पॉलिसी घेतल्यानंतर जर वडिलांचा मृत्यू झाला तर कुटुंबाला विम्यासह पॉलिसीची रक्कम दिली जाते. प्रीमियम माफ केला जातो आणि पॉलिसी विनामूल्य चालू राहते. मुदतपूर्तीच्या वेळी, संपूर्ण रक्कम नॉमिनीला दिली जाते. लाभार्थीचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला 10 लाख रुपये आणि नैसर्गिक मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये दिले जातात.