India News : भारताच्या चांद्रयान- ३ चा विक्रम लँडर सध्या चंद्राच्या भूमीवर निद्रिस्तावस्थेत (स्लिम मोड) आहे. त्याचे एक नवीन छायाचित्र नुकतेच समोर आले आहे. विक्रम लँडरचे हे छायाचित्र दक्षिण कोरियाच्या लुनर ऑर्बिटरने टिपले आहे. विक्रम लँडर या छायाचित्रामध्ये एका छोट्याशा बिंदूसारखा दिसत आहे.
दक्षिण कोरियाच्या पाथ फाइंडर लुनर ऑर्बिटरला अधिकृतरीत्या दनूरी या नावाने ओळखले जाते. हे दक्षिण कोरियाचे पहिलेवहिले स्पेस मिशन आहे. हा ऑर्बिटर ४ ऑगस्ट २०२२ रोजी अमेरिकेतील अब्जाधीश उद्योगपती अॅलन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीने बनवलेल्या रॉकेटच्या साह्याने चंद्राच्या कक्षेत स्थापित करण्यात आला आहे.
अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कोरियाचा हा ऑर्बिटर सध्या चंद्राच्या पृष्ठभागाचे अध्ययन करत आहे. भविष्यात चंद्राच्या भूमीवर उतरण्यासाठी योग्य ठिकाण शोधण्याचे कामही त्याच्यावर सोपवण्यात आले आहे.
दक्षिण कोरियाचा हा दनूरी ऑर्बिटर नासाच्या आसिम मिशनमध्येही योगदान देणार आहे. नासाची आर्टेमिस ही अवकाश मोहीम अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. या मोहिमेच्या माध्यमातून नासा सुमारे पन्नास वर्षांनंतर चंद्रावर अंतराळवीर पाठवणार आहे.
आर्टेमिस मोहिमेचा उद्देश चंद्रावरील बर्फाचे अध्ययन करणे आणि भविष्यात तिथे मानवी वस्ती वसवणे कितपत शक्य आहे याची चाचपणी करणे हा आहे. दनूरी ऑर्बिटरने विक्रम लँडरचे टिपलेले छायाचित्र अद्भुत आहे. कारण चंद्रावर रात्र सुरू असल्याने तेथील तापमान उणे २५३ एवढे घसरले आहे. अशा कडाक्याच्या थंडीत विक्रम लँडर सक्रिय राहणे कठीण आहे.