IMD Rainfall Alert : देशातील अनेक राज्यांमध्ये हवामान बदल पाहायला मिळत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्याने देशातील १० राज्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अनके राज्यातील तापमानात देखील बदल झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
पुढील २४ तासांत जोरदार वाऱ्यासह १० राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीमध्ये किमान तापमान 18 अंश तर कमाल तापमान 31 अंश नोंदवले गेले आहे. 5 एप्रिल रोजी अनेक भागात अंशत: ढगाळ आकाशासह पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
पुढील 4-5 दिवस आंध्र प्रदेश, तेलंगणा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
तसेच आसाम आणि अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गिलगिट, मुझफ्फराबाद, हिमाचल, आसाम, मेघालयसह अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेशसह लडाख, उत्तराखंडच्या डोंगराळ भागात येत्या 24 तासांत मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीची होण्याची शक्यता आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्याने गेल्या ४ दिवसांपासून हवामानात बदल पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश आणि हिमालयात या वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाल्याचा परिणाम दिसून येत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार आणि झारखंडमध्येही ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
जम्मू-काश्मीरवरील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव कमी झाला आहे. ईशान्य भारतात 5 एप्रिलपर्यंत बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. IMD ने दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणासह राजस्थानमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
3 एप्रिलपासून आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाला आहे, ज्याचा थेट परिणाम पंजाब, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा ते पश्चिम बंगाल आणि देशाच्या अनेक भागांमध्ये दिसून येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
महाराष्ट्रातील हवामानात बदल
हवामानात खात्याकडून महाराष्ट्रात देखील हवामान बदलणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आठवडाभर महाराष्ट्राच्या काही भागात रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात ताशी 21 किलोमीटर वेगाने वारे वाहील असेल हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
वातावरणात थोडीशी थंडी कायम राहील तसेच किमान तापमान 28 अंश तर कमाल तापमान 38 अंशांवर नोंदविले जाऊ शकते असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
या ठिकाणी हवामान खात्याने वर्तवला पावसाचा अंदाज
उप हिमालयन पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, केरळ आणि माहे येथे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच दिल्लीच्या काही भागात रिमझिम आणि हलका पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार
5 एप्रिलनंतर, नैऋत्य पंजाब, राजस्थानच्या काही भागांसह हरियाणाचा काही भाग विदर्भ आणि अंतर्गत कर्नाटकात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ईशान्य भारतासह आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्ये हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोरामसह सिक्कीममध्येही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दक्षिण राज्यात पावसाचा इशारा
केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशसह अंतर्गत कर्नाटक, माहे येथे हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या दिवसांत जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट देखील पाहायला मिळू शकतो.