India News : पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात नवीन संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या संग्रहालयात चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या अंतराळवीर नील आर्मस्ट्राँगच्या केसापासून ते चंद्र आणि मंगळावरील खडकापर्यंतच्या दुर्मीळ अंतराळ वस्तू पाहता येणार आहेत.
खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञान संग्रहालयात जवळपास १२०० कलाकृती पाहता येतील. यात नोबेले विजेते आणि प्रख्यात वैज्ञानिकांच्या हस्तलिखित दुर्मीळ डायरी व नोंदीचा समावेश आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ भौतिकशास्त्र केंद्राचे संचालक प्रा. संदीप कुमार चक्रवर्ती यांनी दिली.
७ हजार चौरस फुटांमध्ये पसरलेल्या या संग्रहालयाचे उद्घाटन अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. खगोलशास्त्र आणि अंतराळाशी संबंधित वस्तूंचा व्यापक समावेश असलेले हे देशातील अशा प्रकारचे एकमेव संग्रहालय मानले जात आहे.
अंतराळ विज्ञानाशी संबंधित अनेक संग्रहालये आहेत, परंतु खगोलशास्त्रीय सामग्री असलेले हे एकमेव संग्रहालय असल्याचा दावा चक्रवर्ती यांनी केला. चंद्रावर पहिले पाऊल टाकणाऱ्या अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग यांचे केस, ३७० कोटी वर्षे जुन्या जीवाणूचे अवशेष,
अपोलो ११ चे मॉडेल, राईट बंधूंचे विमान तसेच चंद्र, मंगळ आणि विविध उल्कापिंडांवरील खडकांचा यात समावेश आहे. संग्रहालय युवकांमध्ये उत्साह भरण्याचे आणि त्यांना अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात मार्गदर्शन करण्याचे काम करेल, असा विश्वास ७४ वर्षीय राकेश शर्मा यांनी व्यक्त केला.
४० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या संग्रहालयात १ कोटी रुपये किमतीच्या वस्तू पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. यातील वस्तू जगभरातील विविध लिलावांमधून खरेदी करण्यात आल्या आहेत. तर काही वस्तू या शास्त्रज्ञ आणि अंतराळवीरांच्या कुटुंबीयांनी दान केल्या आहेत..