भारतीय नागरिकांना आता मलेशियामध्ये व्हिसाशिवाय प्रवेश दिला जाणार आहे. भारत आणि चीनच्या नागरिकांना १ डिसेंबरपासून मलेशियामध्ये व्हिसामुक्त प्रवेश मिळणार आहे.
मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी ही माहिती दिली. चिनी आणि भारतीय नागरिक मलेशियामध्ये ३० दिवसांपर्यंत व्हिसामुक्त राहू शकणार आहेत. पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी मलेशियाने हा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी श्रीलंका आणि थायलंडनेही व्हिसा फ्री एण्ट्रीची घोषणा केली होती. तर मलेशियासह सहा देशांच्या नागरिकांना व्हिसाशिवाय देशात प्रवेश देणार असल्याचे चीनने सांगितले होते. व्हिसामुक्त प्रवेश १ डिसेंबरपासून पुढील वर्षी ३० नोव्हेंबर या कालावधीत असणार आहे.
प्रवासी १५ दिवस चीनमध्ये व्हिसामुक्त राहू शकणार आहेत. व्हिएतनामदेखील भारतातील प्रवाशांसाठी व्हिसामुक्त प्रवेश सुरू करू शकते. सध्या जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, डेन्मार्क, स्वीडन आणि फिनलँड या देशांचे नागरिक व्हिएतनाममध्ये व्हिसाशिवाय प्रवेश करू शकणार आहेत.
व्हिएतनामचे सांस्कृतिक, क्रीडा आणि पर्यटन मंत्री गुयेन व्हॅन हंग यांनी पर्यटन सुधारण्यासाठी चीन आणि भारतासारख्या प्रमुख बाजारपेठांसाठी अल्पकालीन व्हिसा माफीची मागणी केली आहे. यापूर्वी आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, थायलंडने भारत आणि तैवानच्या नागरिकांसाठी व्हिसामुक्त प्रवेशाची घोषणा केली होती.
भारतीय १० नोव्हेंबर २०२३ ते १० मे २०२४ पर्यंत व्हिसाशिवाय थायलंडला भेट देऊ शकतात आणि तेथे ३० दिवस राहू शकतात. पर्यटन हंगामापूर्वी घेतलेल्या या निर्णयामुळे थायलंडमध्ये अधिक पर्यटक आकर्षित होतील, अशी अपेक्षा आहे.
व्हिएतनामने ऑगस्टच्या मध्यापासून सर्व राष्ट्रांतील लोकांना ई-व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. या वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत जवळपास १० दशलक्ष आंतरराष्ट्रीय प्रवासी व्हिएतनाममध्ये आले.
व्हिएतनाममधील फु क्वोक बेट, न्हा ट्रांग, डा नांग, हा लॉन्ग बे आणि होई एन ही ठिकाणे भारतीय पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. व्हिएतजेट भारत ते व्हिएतनामपर्यंत उड्डाणे चालवते. राऊंड ट्रिपचे तिकीट १४-१५ हजार रुपयांना मिळते.