Cloud Seeding:- भारत हा शेतीप्रधान देश असून भारताची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर आधारित आहे व कृषी क्षेत्र हे पावसावर अवलंबून असल्याने मान्सूनचा पाऊस हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्वाचा आहे असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही.
त्या अनुषंगाने जर आपण यावर्षीच्या मान्सूनचा राज्यातील विचार केला तर सुरुवातच निराशाजनक झालेली होती व जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यांचा अपवाद वगळता बाकी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे याचा विपरीत परिणाम हा कृषी क्षेत्रावर पाहायला मिळत आहे.
यामागे अल निनो कारणीभूत ठरला असून यावर्षीच्या पावसावर अलनिनोचा परिणाम पाहायला मिळाला. त्यामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी अपेक्षा इतका किंवा पुरेसा पाऊस झालाच नाही. राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद या हंगामामध्ये झाली परंतु क्लाऊड सिडिंगमुळे सामान्य पेक्षा अठरा टक्के पाऊस जास्त झाला आहे.
विशेष म्हणजे राज्यातील सोलापूरमध्ये हा प्रयोग राबवण्यात आला व पुणे हवामान शास्त्र विभागाच्या माध्यमातून हा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाचा संशोधन अहवाल अमेरिकन हवामान विज्ञान सोसायटीच्या बुलेटिनमध्ये देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
या प्रयोगाच्या माध्यमातून जी काही माहिती मिळाली त्या माहितीनुसार ज्या भागांमध्ये कमी पाऊस झाला आहे त्या भागामध्ये अशा प्रकारचा प्रयोग राबवण्याची सूचना करण्यात आली होती. याच प्रक्रियेला हायग्रोस्कोपिक क्लाऊड सीडींग असे नाव देण्यात आले.
हायग्रोस्कोपिंग सीडींग कशाला म्हणतात?
या पद्धतीमध्ये ज्या ठिकाणी तापमान 0° पेक्षा जास्त असते अशा ठिकाणी हायग्रोस्कोपिंग सीडींगचा प्रयोग राबवण्यात येतो. या प्रयोगामध्ये प्रामुख्याने ढगांवर कॅल्शियम क्लोराइडची फवारणी केली जाते. या प्रयोगाबद्दल अधिकची माहिती देताना प्रोजेक्ट डायरेक्टर थारा प्रभाकरन यांनी सांगितले की या प्रकल्पात ज्या ठिकाणी कॅल्शियम क्लोराइडची फवारणी करण्यात आलेली होती त्या ठिकाणी जास्त पाऊस पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
म्हणजे सामान्यपेक्षा अशा ठिकाणी 18% चा पाऊस जास्त झाला. या तंत्रज्ञानामध्ये प्रामुख्याने विचार केला तर 2017 ते 2019 या कालावधीमध्ये बीच क्लाऊड सीडींग प्रयोग करण्यात आले होते. या प्रयोगामध्ये 276 ढगांचे नमुने वैज्ञानिकांनी तपासले.
हा प्रयोग करण्याकरिता एका स्पेशल एअरक्राफ्टचा देखील वापर करण्यात आला होता. यामध्ये शास्त्रज्ञांनी ग्लेशियोजनिक सीडींग तंत्राचा वापर याकरिता केला. या तंत्रज्ञानाचा वापर ढगांच्या थंड पाण्याच्या भागावर करण्यात आला व यामुळे सोलापुरातील शंभर वर्ग किमी भागात जास्त पाऊस पडला.
हे तंत्रज्ञान खूप महत्त्वपूर्ण असून जर देशातील अनेक भागात पाऊस पुरेसा पडला नाही तर भविष्यामध्ये ढगांवर कॅल्शियम क्लोराइडची फवारणी करण्याचा प्रयोग होण्याची शक्यता अधिक आहे. पुणे हवामान विभागाने जो काही प्रयोग केला आहे त्याच्या अहवालाचा अभ्यास करण्यात येऊन त्या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. जर हे तंत्रज्ञान यशस्वी झाले तर देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूप वरदान ठरेल हे मात्र निश्चित.