Chandrayaan-3 : भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान- ३ मोहिमेतील रोव्हर ‘प्रज्ञान’ आणि लँडर ‘विक्रम’ हे आज शुक्रवारी निद्रावस्थेतून पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता आहे. प्रज्ञान व लँडर आपल्यावर सोपवलेली कामगिरी पूर्ण करून १७ दिवसांपूर्वी निद्रावस्थेत गेले होते.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर १४ दिवसांच्या रात्रीनंतर आता सूर्योदय झाला आहे. त्यामुळे सौरऊर्जेवर चालणारे लँडर, रोव्हर सक्रिय होण्याची आशा इस्रोने गुरुवारी व्यक्त केली.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने २ सप्टेंबर रोजी रोव्हर प्रज्ञान तर ४ सप्टेंबर रोजी लँडर विक्रमला स्लीपमोडमध्ये टाकले होते. निद्रावस्थेत जाण्यापूर्वी दोन्ही यंत्रांनी चंद्राचा पृष्ठभाग, वातावरणाची नवी माहिती पृथ्वीवर पाठवली होती.
सद्यः स्थितीत रोव्हरचे रिसीव्हर चालू आहे. जर दोन्ही यान निद्रावस्थेतून बाहेर आले तर पुढील १४ दिवस ते पुन्हा चंद्रावर मोहीम राबवतील. पृथ्वीवरील १४ दिवस म्हणजे एक चांद्रदिन असतो आणि इतक्याच दिवसांची रात्र असते.
रात्रीच्या वेळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान उणे २३८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते. त्यामुळे रोव्हर आणि लँडरची यंत्रणा ठप्प पडू शकते. तसे झाले तर प्रज्ञान व विक्रम भारताचे चांद्रदूत म्हणून कायमस्वरुपी तेथे विसावतील.
विक्रम लँडर चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले त्याचे ‘शिवशक्ती पॉइंट’ नामकरण करण्यात आले आहे. लँडरमधून बाहेर पडलेले रोव्हर सुमारे १०० मीटरचा फेरफटका मारून पुन्हा त्याच जागी आले होते.
चंद्रावर सूर्योदय
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सूर्योदय झाला आहे. रोव्हर व लँडरच्या सौर पॅनेलवर पुरेसा सूर्यप्रकाश पडल्यानंतर शुक्रवारी त्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी इस्रोकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत.