भारत

सैनिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन राबविणार ही योजना

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील माजी सैनिक, शहीद सैनिकांचे कुटूंब व कार्यरत सैनिक यांचे विविध विभागातील शासकीय कामे मार्गी लावण्यासाठी 7 फेब्रुवारी ते 23 एप्रिल 2022 यादरम्यान 75 दिवस ‘अमृत जवान अभियान’ राबविण्यात येणार आहे.

लोकशाही दिनाच्या धर्तीवर प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी ‘अमृत जवान सन्मान दिन’ आयोजित केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रपरिषदेत दिली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित उपस्थित होते. जिल्ह्यात 15 हजार पेक्षा जास्त माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवांची संख्या जवळपास तीन हजार, तसेच शहीद सैनिकांच्या कुटुंबांची संख्या 50 आहे. माजी सैनिकांवर अंदाजे 50 हजार कुटुंबीय अवलंबून आहेत.

सीमेवर तैनात असल्याने व स्वग्रामपासून दूर असल्याने सैनिकांची प्रशासनात अनेक कामे पाठपुराव्या अभावी अथवा वेळेअभावी प्रलंबित असतात. पाठपुरावा करण्यासाठी माहितीगार मनुष्य नसल्याने प्रलंबित राहतात.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने सैनिकांचा सन्मान करण्यासाठी ‘अमृत जवान सन्मान अभियान 2022’ राबविण्यात येणार आहे. प्रत्येक शासकीय विभागाने तालुका व जिल्हास्तरावर हे अभियान राबविण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करावी.

या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये एक खिडकी कक्ष या तत्वाप्रमाणे सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.

या कक्षात दररोज दुपारी 12 ते 3 या वेळेत कार्यरत सैनिक, माजी सैनिक व त्यांचे निकटवर्तीय यांचे विविध विभागांकडील तक्रार अर्ज स्विकारण्यात यावेत.

तालुकास्तरीय समितीची बैठक 7 दिवसातून एकदा आयोजित केली जाईल. या अभियानात उत्कृष्ट योगदान देणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांना गौरविण्यात येणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts