Vande Bharat Train:- सध्या संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेले असून प्रवाशांना वेगवान आणि आरामदायी प्रवासाची अनुभूती मिळावी याकरिता वंदे भारत एक्सप्रेस महत्त्वाच्या ठरत आहेत. सध्या संपूर्ण देशाचा विचार केला तर 34 मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेल्या असून या माध्यमातून 68 फेऱ्या सुरू आहेत.
महाराष्ट्राचा विचार केला तर सध्या मध्य रेल्वेवर पाच वंदे भारत सुरू असून यामध्ये मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते मडगाव, मुंबई ते सोलापूर, नागपूर ते बिलासपुर आणि नागपूर ते इंदूर या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सध्या सुरू आहे. यातील आपण मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या वंदे भारत एक्सप्रेसचा विचार केला तर प्रवाशांचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिसून येत आहे.
जर आपण नोव्हेंबर महिन्याची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रातील सोलापूर ते मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. तसेच जर आपण रेल्वे मंत्रालयाचा विचार केला तर रेल्वे मंत्रालयाने मे 2024 पर्यंत देशातील जे काही लोकप्रिय तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळे आहेत त्यांना जोडणाऱ्या 30 ते 35 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवण्याची योजना आखली असून त्यावर सध्या काम सुरू आहे.
या प्लॅनिंग नुसार जर सर्व व्यवस्थित पार पडले तर नव्या वर्षांमध्ये देशातील अनेक तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळे या वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून जोडले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये देशातील सर्व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र या वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून जोडली गेली तर रेल्वे विभागाला देखील मोठा महसूल मिळण्यास मदत होणार आहे.
श्री क्षेत्र शेगाव साठी सुरू होणार वंदे भारत ट्रेन
शेगाव हे देशांमध्ये त्या ठिकाणची शिस्तबद्धता व स्वच्छतेबाबत प्रसिद्ध असून या ठिकाणी गजानन महाराजांचे देवस्थान आहे. दररोज लाखोच्या संख्येने भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल होत असतात. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांचा प्रवास आरामदायी व वेगवान व्हावा याकरिता भारतीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून लवकरच पुणे ते शेगाव आणि मुंबई ते शेगाव दरम्यान वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
एवढेच नाही तर त्या संदर्भातील सूचनेचा प्रस्ताव सुद्धा मध्य रेल्वे कडून मागविण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. याबाबतीत भारतीय रेल्वेने सर्व झोनला पत्र पाठवले असून कोणत्या मार्गावर वंदे भारत चालवता येईल या संदर्भातल्या सूचना देखील मागवल्या होत्या.
यावर मध्य रेल्वे कडून 331 किलोमीटर अंतराच्या मुंबई ते संभाजीनगर, 562 किमी अंतराच्या पुणे ते सिकंदराबाद, 554 किलोमीटर अंतराचे मुंबई ते शेगाव आणि 470 किलोमीटर अंतराचे पुणे ते शेगाव रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलेला आहे.
एवढेच नाही तर आता या प्रस्तावावर रेल्वे बोर्डाकडून चर्चा करण्यात आली असून मुंबई ते शेगाव दरम्यान वंदे भारत ट्रेन चालवण्याचा विचार सध्या सुरू असल्याची माहिती देखील समोर आली आहे. जर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.