Vande Bharat Train:- भारतीय रेल्वे भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून प्रवासी आणि मालवाहतुकीच्या दृष्टीने देखील भारतीय रेल्वेची महत्त्वाची भूमिका आहे. भारताच्या उत्तरे पासून ते दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमेपासून ते पूर्वेपर्यंत रेल्वेचे नेटवर्क विस्तारलेले आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करतात.
भारतीय रेल्वे देशाच्या विकासाची वाहिनी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याच भारतीय रेल्वेचे जर प्रगत स्वरूप म्हटले तर आता भारताच्या विविध शहरादरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आल्या असून या वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशाना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मोठ्या प्रमाणावर येत आहे.
तसेच यातील सोयी सुविधा पाहता तिकीट दर जास्त असताना देखील प्रवाशांनी या वंदे भारत ट्रेनला खूप मोठ्या प्रमाणावर प्रवासासाठी पसंती दिल्याचे सध्या स्थिती आहे. जर आपण प्रवाशांचा ट्रेंड पाहिला तर प्रत्येक दिवसाला वंदे भारत ट्रेन मधून प्रवासाला मोठ्या प्रमाणावर प्रवाशांकडून प्रतिसाद देण्यात येत आहे.
हे चित्र आपल्याला एका आकडेवारीवरूनच सिद्ध होऊ शकते. नोव्हेंबर महिन्याच्या एक महिन्याच्या कालावधीतच एक लाख 94 हजार 902 प्रवाशांनी वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून प्रवास केला. यावरून आपल्याला याचा अंदाजा येऊ शकतो. एक ते 30 नोव्हेंबर या 30 दिवसांच्या प्रवाशांच्या संख्येची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या एक महिन्याच्या कालावधीत प्रवाशांनी सर्वाधिक पसंती ही सोलापूर ते सीएसएमटी मुंबई या वंदे भारत ट्रेनला दिलेली आहे.
वाचा कोणत्या वंदे भारत ट्रेन मधून किती केला प्रवाशांनी प्रवास?
एक ते 30 नोव्हेंबर या 30 दिवसाच्या प्रवाशांची संख्याची माहिती मध्य रेल्वे कडून देण्यात आली असून त्यानुसार पाहिले तर सर्वाधिक 32854 प्रवाशांनी 22226 सोलापूर ते सीएसएमटी, मुंबई या वंदे भारत ट्रेन मधून प्रवास केल्याचे या आकडेवारीवरून पुढे आले आहे. जर या वंदे भारत ट्रेनमधील प्रवाशांचे टक्केवारी पाहिली तर ती तब्बल 116.54% इतकी आहे.
त्या खालोखाल जर पाहिले तर याच मार्गावर 22225 सीएसएमटी मुंबई ते सोलापूर या मार्गावर तीस हजार 487 प्रवाशांनी प्रवास केला व ही टक्केवारी पाहिली तर तब्बल 107.93% आहे. तसेच त्या खालोखाल 22224 साईनगर शिर्डी ते सीएसएमटी मुंबई या वंदे भारत ट्रेनमध्ये 23,431 प्रवाशांनी प्रवास केला व ही टक्केवारी 86.72% आहे. तसेच याच मार्गावरील 22223 शिर्डी ते सीएसएमटी वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून 25 हजार 434 प्रवाशांनी प्रवास केला व ही टक्केवारी 86.72% इतकी आहे.
तसेच नागपूर ते बिलासपुर या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस ला देखील चांगला प्रतिसाद मिळाला. आकडेवारी पाहिली तर 20826 नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये 14733 प्रवाशांनी प्रवास केला व ही टक्केवारी 106.91% इतके आहे. तर याच मार्गावरील 20825 बिलासपूर ते नागपूर वंदे भारत ट्रेनमध्ये पंधरा हजार तीनशे पंधरा प्रवाशांनी प्रवास केला व ही टक्केवारी तब्बल 111.13% इतकी आहे.
त्या खालोखाल मुंबई गोवा या मार्गावर धावणाऱ्या 22229 या वंदे भारत मध्ये 14 हजार 84 प्रवाशांनी प्रवास केला आणि ही टक्केवारी 102.20% आहे. तर याच मार्गावरील गोवा ते सीएसएमटी मुंबई(22230) या ट्रेनमध्ये 14,071 प्रवाशांनी प्रवास केला व ही टक्केवारी 102.11 टक्के आहे.
याशिवाय नुकतीच सुरू झालेली नागपूर ते इंदोर या वंदे भारत एक्सप्रेसला देखील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून देवाधिदेव महादेव यांच्या उजनीतील महाकाल मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची या वंदे भारत मुळे चांगली सुविधा निर्माण झाली आहे.