Weather Update : देशात सध्या अनेक राज्यामध्ये उष्णेतचा पारा अधिक वाढला आहे. त्यामुळे अनेकजण उकाड्याने हैराण झाले आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये पाऊस कोसळत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
सध्या अनेक राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तसेच येत्या पुढील २ दिवसांत हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वातावरणात गारवा निर्माण होऊ शकतो.
या राज्यांमध्ये पावसाचा इशारा
हवामान खात्याकडून पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तापमानात घट होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. गुरुवारी २७ एप्रिल रोजी अनेक राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती.
पुढील पाच दिवस मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये जोरदार वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमध्ये पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे.
येथे गारपिटीची शक्यता
सध्या अवकाळी पाऊस पडत असल्याने त्यासोबत गारा देखील पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
ओडिशा आणि झारखंडमध्ये पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. यासोबतच आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालयमध्येही गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 29 आणि 30 एप्रिल रोजी पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये पुढील पाच दिवस पावसाचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
वादळी वाऱ्यासह पावसाच्या वेळी सतर्क राहण्याच्या सूचना
सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागांत प्रचंड नुकसान होत आहे. शेतीसह कच्ची घरे, भिंती पडून व वीज पडून घरांचे व झोपड्यांचे नुकसान होत आहे. अवकाळी पावसाच्या वेळी हवामान खात्याकडून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.