ऑगस्टमध्ये किरकोळ महागाईचा दर खूप जास्त असला तरी सप्टेंबरपासून महागाई कमी होऊ शकते, असा आशावाद रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे.
टोमॅटोचे भाव आधीच घसरले असून या महिन्यापासून इतर भाज्यांचे किरकोळ भावही कमी होण्याची अपेक्षा असल्याचे दास यांनी इंदोरच्या देवी अहिल्या विद्यापीठाने स्थानिक विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
लोकांना परवडणाऱ्या किमतीत टोमॅटो आणि इतर गरजेच्या वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. गैर बासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत नुकतीच कपात करण्यात आली असल्याचे दास यांनी यावेळी सांगितले.
जुलैमध्ये किरकोळ महागाई खूप उच्च पातळीवर होती. याचा सर्वांनाच धक्का बसला. मुख्यतः टोमॅटो आणि इतर भाज्यांचे भाव जास्त असल्याने जुलैमध्ये किरकोळ महागाई जास्त होईल अशी आमची अपेक्षा होती, असे दास म्हणाले. सर्व जागतिक आव्हाने असूनही, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, असेही ते म्हणाले.
ग्राहक किंमत निर्देशांक सलग चार महिने रिझर्व्ह बँकेच्या २ ते ६ टक्क्यांच्या सहनशीलतेच्या पातळीत राहिल्यानंतर जुलैमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाईने वरची मर्यादा ओलांडली. जुलैमध्ये भाजीपाला विशेषतः टोमॅटोच्या किमतीत अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाल्याने किरकोळ महागाई वाढली.
भाज्यांच्या महागाई दरात सातत्याने वाढ होत असून ती वार्षिक आधारावर ३७.३४ टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यात वार्षिक आधारावर ०.९३ टक्के घट नोंदवली गेली. जूनमधील ४.६३ टक्क्यांवरून खाद्य आणि पेय पदार्थांची महागाई वाढून १०.५७ टक्क्यांवर पोहोचली आहे. जूनमध्ये भरड धान्याची महागाई १३.७१ टक्क्यांवर पोहोचली.
या वस्तूंची देखील महागाई
गेल्या महिन्यात तृणधान्यांचा भाव १३.०४ टक्के, मांस आणि मासे २. २५ टक्क्यांनी, अंडी ३.८२ टक्क्यांनी, दूध ८.३४ टक्क्यांनी आणि फळांचा दर ३.१६ टक्क्यांनी वाढला आहे. याशिवाय भाजीपाला ३७.३४ टक्के, डाळी १३.२७ टक्के, कापड व पादत्राणे ५.६४ टक्के, इंधन व प्रकाश ३.६७ टक्के वाढला आहे.
जुलै महिन्यामध्ये महागाईचा उच्चांक
किरकोळ महागाईचा दर जूनमधील ४.८७ टक्क्यांच्या तुलनेत वाढून जुलैमध्ये ७.४४ टक्के झाला. रिझर्व्ह बँकेने दोन ते सहा टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचे लक्ष्य ठेवले होते, पण टोमॅटोसह खाद्यपदार्थांच्या किमतीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे किरकोळ महागाईचा दर जुलैमध्ये ७ टक्क्यांच्या पुढे गेला.