१० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : जिल्हा बँकेसाठी गुरुवार पासून पुणे येथे भरती प्रक्रिया सुरू झाली असून, ७०० जागांसाठी सुमारे २८ हजार अर्ज आलेले आहेत.आपल्या मुलाला अथवा मुलीला जवळच्या नातेवाईकाला या भरतीच्या माध्यमातून नौकरी मिळावी म्हणून गेल्या काही दिवसांपासून बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांच्याकडे कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्र परिवार, नातेवाईक यांची मोठी वर्दळ वाढल्याने बँकेच्या पदाधिकाऱ्यांची यामुळे डोकेदुखी वाढली आहे.
यासंदर्भात बँकेचे अध्यक्ष आ. शिवाजीराव कर्डिले यांनी ठोस भूमिका घेत भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर भूमिकाच बँकेच्या वतीने मांडली.जिल्हा सहकारी बँक आशिया खंडातील सर्वात मोठी बँक असून, या बँकेचा पारदर्शक कारभार सुरू आहे, त्यामुळे होणारी भरती प्रक्रिया देखील पारदर्शकपणे व्हावी, अभ्यासू, हुशार, गुणवंत विद्यार्थ्यांना या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून न्याय मिळावा, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात इतक्या उमेदवारांची परीक्षा घेण्याची सर्व तांत्रिक सुविधा उपलब्ध नाही.परीक्षेसाठी आवश्यक कॉम्प्युटर, लाईट, इंटरनेट, कनेक्टिव्हीटी, आदी सुविधा शहरात पुरेशा प्रमाणात न मिळाल्यास अडचणी आल्या असत्या,असे कंपनीचे म्हणणे होते,त्यात तथ्य आहे,त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी संबंधित कंपनीच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया होणार आहे.
भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार व्हावी, यासाठी राज्य सरकारने त्यांच्या निकषास पात्र सर्व नियम व अटी पूर्ण करणाऱ्या सहा कंपन्यांचा पॅनल तयार करून बँकेस कळविला. त्यानुसार बँकेने रितसर शासनाचे मार्गदर्शन व सूचनानुसार कोटेशन मागवून त्यातील एका कंपनीला या भरती प्रक्रियेचे कामकाज देण्यात आले.
भरती प्रक्रियेच्या नावाखाली काही स्वयंघोषित एजंटांकडून परीक्षार्थी विद्यार्थी अथवा त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक होऊ शकते.अशा स्वयंघोषित एजंटापासून परीक्षार्थी विद्यार्थी व त्यांच्या नातेवाईकांनी सावध रहावे.भरती प्रक्रियेमध्ये कुठल्या प्रकारची वशिलेबाजी होणार नसून आर्थिक देवाण-घेवाण कोणाशी करू नये, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे.
बँकेचा कारभार पारदर्शकपणे सुरू असून, बँकेची भरती प्रक्रिया देखील पारदर्शकपणे व्हावी, हा एकमेव प्रामाणिक हेतू आहे.मुलाखतीचे पाच गुण देण्यासाठी मुलाखत समिती असणार आहे, त्यामध्ये संचालकांचा समावेशदेखील नाही. सदर समितीमध्ये सहकार खाते, एम्प्लॉयमेंट, समाजकल्याण, महिला व बाल कल्याण, आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प, आदी विभागांचे अधिकारी तसेच बँकेचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी हे असणार असून, ते गुणदान करणार आहेत.
त्याचप्रमाणे पाच गुण हे उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कशाप्रकारे मिळणार आहे हे देखील जाहिरीतीत स्पष्टपणे नमूद केलेले आहे. सदर समितीमध्ये चेअरमन म्हणून माझा देखील समावेश नको, अशी प्रामाणिक भावना आम्ही सहकार मंत्र्यांकडे व्यक्त केली असल्याचे आ. कर्डिले यांनी सांगितले.
जिल्हा सहकारी बँकेची भरतीसाठीची परीक्षा काल (दि.९) जानेवारी पासून पुणे या ठिकाणी सुरू झाली आहे.बँकेची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी, यासाठीच पुण्यासारख्या ठिकाणी ऑनलाइन सिस्टीमने ही प्रक्रिया पूर्ण होणार असून स्वयंघोषित एजंटापासून परीक्षार्थी व त्यांच्या नातेवाईकांनी सावध रहावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे.