Police Bharati : अलीकडे नवयुवक तरुणांमध्ये शरीरावर टॅटू काढण्याची मोठी क्रिस पाहायला मिळते. तरुणी देखील मागे नाहीत. तरुणी देखील आपल्या शरीरावर टॅटू काढणे पसंत करतात. काही तरुण-तरुणी आपल्या संपूर्ण अंगावर टॅटू काढतात. फिल्मस्टार, क्रिकेटर, ऍथलिट्स आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू काढतात. भारताचा आक्रमक क्रिकेटर, दिग्गज फलंदाज विराट कोहली याने आपल्या शरीरावर अनेक टॅटू काढलेले आहेत.
टी ट्वेंटी फायनल मध्ये अशक्य वाटणारी झेल टिपणारां मुंबईकर सूर्यकुमार यादवने सुद्धा आपल्या शरीरावर असंख्य टॅटू काढलेले आहेत. याशिवाय अनेक अभिनेते आहेत ज्यांनी आपल्या शरीरावर टॅटू काढलेले आहे. यामुळे अशा क्रिकेटर, फिल्मस्टार सेलिब्रिटीला अनुकरण करण्याच्या प्रयत्नातून अनेक जण टॅटू काढतात.
मात्र शरीरावर टॅटू काढलेला असेल तर पोलीस दलात सामील होताना अडचणींचा सामना करावा लागतो. शरीरावर टॅटू काढलेला असेल तर पोलीसात नोकरी मिळू शकत नाही असा नियम असल्याचे बोलले जाते. दरम्यान अशाच एका प्रकरणात माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच एक मोठा निर्णय दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश राज्यातील बागपत येथील वीस वर्षीय दीपक यादवला त्याच्या शरीरावर टॅटू असल्याने दिल्ली पोलीस सुद्धा त्याला नोकरी मिळू शकली नाही. दिल्ली पोलीस भरती मध्ये दीपक ला नाकारले गेले. यामुळे दीपकने या विरोधात कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आता या प्रकरणावर माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.
फिकट टॅटू चिन्हांच्या आधारे उमेदवाराला सरकारी नोकरीतून नाकारता येणार नाही, असा महत्त्वाचा आणि अतिशय मोठा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. अशा परिस्थितीत आज आपण टॅटूच्या कारणाने कोणती सरकारी नोकरी मिळतं नाही, यामागे नेमके कारण काय आहे ? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
शरीरावर टॅटू असल्यास सरकारी नोकरी मिळतं नाही का?
सर्वच सरकारी नोकरीमध्ये शरीरावर टॅटू असल्यास नोकरी नाकारली जात नाही. काही नोकऱ्या अशा आहेत जिथे टॅटू संदर्भात कडक नियम आहेत आणि काही ठिकाणी टॅटू काढण्यावर बंधने आहेत. पण टॅटू असल्याकारणाने नोकरी का नाकारली जाते हे आधी आपण समजून घेऊया. टॅटूमुळे एचआयव्ही, त्वचा रोग, हिपॅटायटीस ए आणि बी सारखें आजार होऊ शकतात.
यामुळे अशा रोगांचा प्रसार होतो. टॅटू असणारे लोक त्यांचे काम गांभीर्याने घेत नाहीत असा समज यामुळे तयार होतो. कामात समानता असावी यासाठी ही अनेक ठिकाणी टॅटू असणाऱ्यांना मनाई आहे. ज्यांच्या अंगावर मोठमोठे टॅटू असतात त्यांना सैन्य भरती मध्ये परवानगी दिली जात नाही. टॅटू असलेली व्यक्ती सहज ओळखता येते. यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट योग्य नाहीये.
काही लोकांना टॅटू काढण्यास परवानगी
याबाबत भारत सरकारचे काही मार्गदर्शक तत्वे आहेत. जर समजा एखाद्या जमातीची, समाजाची रूढी, परंपरेनुसार एखाद्या व्यक्तीने शरीराच्या कोणत्याही भागावर कायमस्वरूपी टॅटू काढला असेल तर अशा प्रकरणात त्याला परवानगी राहणार आहे. तसेचं, इतर लोकांच्या शरीरावर लहान टॅटू असल्यास परवानगी आहे. पण टॅटूमध्ये धार्मिक चिन्हे किंवा कोणत्याही प्रिय व्यक्तीचे नाव नसावे.
याबाबत देशाच्या संरक्षण मंत्रालयाने सुद्धा माहिती दिली आहे. संरक्षण मंत्रालयाचे देखील याबाबत काही नियम आहेत. या नियमानुसार भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि पोलीस विभागात सामील झालेल्या व्यक्तीच्या शरीराच्या कोणत्याही बाह्य भागावर, कोपरापासून मनगटापर्यंत किंवा तळहाताच्या मागच्या बाजूला टॅटू काढण्याची परवानगी नाहीये.
मात्र, शरीराच्या आतील भागावर लहान टॅटू काढण्याची परवानगी आहे. टॅटू असभ्य, लैंगिकतावादी किंवा वर्णद्वेषी नसावेत. साधारणपणे, टॅटू आक्षेपार्ह नसल्यास भरती उमेदवारास अपात्र घोषित केले जाऊ शकत नाही हे स्पष्ट होते. दिल्ली उच्च न्यायालयाने देखील असाचं निर्णय दिला आहे.