कृषी

ज्या जमिनीत तण उगवत नव्हते अशा क्षारपड जमिनीत एकरी घेतले 82 टन उसाचे उत्पादन! वाचा कोणती वापरली पद्धत?

Farmer Success Story:- असे म्हटले जाते की जर मनामध्ये जबर इच्छाशक्ती असेल तर कुठलेही अशक्य गोष्ट ही शक्य करता येते व त्यामध्ये यशस्वी होता येते. याकरिता इच्छाशक्ती असणे गरजेचे असतेच परंतु त्या दृष्टिकोनातून करावे लागणारे प्रयत्न म्हणजेच कष्ट देखील अफाट असणे गरजेचे असते व कष्टांमध्ये किंवा प्रयत्नांमध्ये सातत्य असणे देखील तितकेच गरजेचे असते व तेव्हा कुठे व्यक्ती यशस्वी होतो.

हेच तत्व प्रत्येक क्षेत्राला जसे लागू होते तसेच ते शेतीक्षेत्राला देखील लागू होते. शेतीमध्ये कष्ट तर करावेच लागतात परंतु योग्य दिशेने कष्ट केले तर शेतीमधून देखील अशक्य गोष्टी शक्य होतात. त्यामुळे आता कष्टाला तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकरी मोठ्या प्रमाणावर कमी क्षेत्रामध्ये देखील उत्पादन घेऊन लाखोत उत्पन्न मिळवत आहेत.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील सलगर कुटुंबाची यशोगाथा बघितली तर ती या मुद्द्याला साजेशी अशी आहे. सलगर कुटुंबाने ज्या जमिनीवर तण उगवणे देखील कठीण होते अशा क्षारपड जमिनीमध्ये चक्क ८२ टनापर्यंत उसाचे उत्पादन घेतले. ही किमया सलगर कुटुंबाने कसे शक्य केले याबद्दलची माहिती बघू.

सलगर कुटुंबाने क्षारपड जमिनीतून घेतले एकरी 82 टन उसाचे उत्पादन

वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील सलगर कुटुंबाने क्षारपड जमिनीवर सच्छीद्र निचरा प्रणाली उभारली व पूर्ण 9 एकर शेतीचा कायापालट केला. त्यांची ही संपूर्ण जमीन अशी होती की त्या ठिकाणी फक्त बाभळाची झाडे उगवायची व त्याशिवाय साधे तण देखील उगत नव्हते.

परंतु अशा जमिनीवर त्यांनी 82 टन एकरी असे उसाचे उत्पादन मिळवले व इतर शेतकऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण करून दिला. वाळवा तालुक्यातील बोरगाव परिसरामध्ये धोंडीराम सलगर तसेच तानाजी सलगर व बाबासाहेब सलगर या तिन्ही भावांची जमीन आहे व संपूर्ण जमिन क्षारपड असल्यामुळे ती नापीक होती.

परंतु या परिसरातील सर्वच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून सर्व क्षारपड शेती सच्छीद्र निचरा प्रणालीच्या माध्यमातून शेती उत्पादन मिळवण्यासाठी योग्य करता यावी याकरिता शासन दरबारी पाठपुरावा केला.

परंतु शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची मदत याकरिता करण्यात आली नाही. परंतु यानंतर मात्र सलगर बंधूंनी हार न मानता ही जमीन पिकांचे उत्पादन देण्यायोग्य करण्याकरिता प्रयत्न सुरू केले.

यामध्ये त्यांनी त्यांच्या शेतीत दोन फुटांनी तांबडी माती भरून वेगळी पिके पिकवण्याचा प्रयत्न केला व त्यामध्ये देखील त्यांना अपयश आले. शेवटी त्यांनी स्वतः खर्च केला व सच्छीद्र निचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला व नऊ एकर क्षेत्रावर सहा इंची पीव्हीसी लाईन,

चार इंची सच्छीद्रचे पाईप संपूर्ण क्षेत्रावर उभ्या, आडव्या आणि समोर व बाजूला टाकले व त्यातून त्यातील क्षारयुक्त पाणी मेन लाईन मधून 2000 फूट लांब तीन चेंबरद्वारे खाऱ्या ओढ्यात नेऊन सोडले व या सर्व कामाकरिता त्यांना सहा लाख रुपये खर्च आला व त्यांनी स्वतः हा संपूर्ण खर्च केला.

त्यानंतर त्यांनी या शेतामध्ये हरभरा व शाळू सारखी पिके घ्यायला सुरुवात केली व या पिकांचे उत्पादन जेव्हा त्यांना मिळाले त्यानंतर हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. त्यानंतर त्यांनी तागासारखी पिके घेऊन जमिनीचा पोत वाढवण्याकडे लक्ष केंद्रित केले व सगळ्या गोष्टी करून दोन वर्षांनी उसाची लागवड केली. आज या जमिनीतून त्यांनी एकरी 82 टन इतका उसाचा उतारा मिळवला आहे व त्यामुळे त्यांच्या कष्टाला आता फळ मिळाले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts