Farmer Success Story:- महाराष्ट्रातील जर प्रत्येक जिल्हा बघितला तर यामध्ये पिकांच्या बाबतीत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला वेगळेपण दिसून येते. उदाहरणच घ्यायचे झाले तर नाशिक जिल्हा म्हटले म्हणजे डोळ्यासमोर येते द्राक्ष आणि कांदा हे पीक. म्हणून नाशिकला द्राक्ष पंढरी म्हणून संबोधले जाते व त्यासोबत जळगाव जिल्हा म्हटला म्हणजे या ठिकाणी केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते म्हणून जळगाव जिल्ह्याला केळीच्या आगार असे देखील म्हणतात.
याच पद्धतीने जर आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा जर बघितला तर तो अहिल्यानगर असून या जिल्ह्यातील जर शेती बघितली तर प्रामुख्याने उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते व सर्वात जास्त साखर कारखाने देखील याच जिल्ह्यात आहेत.
त्यामुळे या ठिकाणचे शेतकरी नगदी पीक म्हणून ऊस शेतीकडे बघतात व मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड या पट्ट्यात होते. परंतु याच अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथील प्रगतीशील शेतकरी संग्राम येळवंडे
यांनी मात्र पारंपारिक ऊस शेतीला फाटा देत सव्वादोन एकरावर आले लागवड केली व आले लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. आज त्यांनी लागवड केलेली आले काढणीला आले असून यातून एकरी 130 ते 150 क्विंटल उत्पादन मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्याने यशस्वी केली आल्याची लागवड
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उसाच्या लागवडीकरिता प्रसिद्ध असलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या सोनई या गावचे प्रगतीशील शेतकरी संग्राम येळवंडे यांनी पारंपारिक ऊस शेतीला फाटा देत सव्वादोन एकरामध्ये आल्याची लागवड केली व हा प्रयोग यशस्वी केला.
आज त्यांचे हे सव्वादोन एकरातील आले काढणीला आले असून एकरी 130 ते 150 क्विंटल उत्पादन मिळेल अशी अपेक्षा त्यांना असून त्यातून एकरी 14 ते 15 लाखांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. मागच्या वर्षी देखील त्यांनी आल्याची एका एकरवर लागवड केली होती व त्यातून 108 क्विंटल उत्पादन त्यांनी मिळवले होते.
त्याला शेतावरच नऊ हजार रुपये क्विंटल दर मिळाला व त्यातून दहा लाखाचे उत्पन्न त्यांना मिळाले होते. याकरिता सर्व खर्च वजा जाता त्यांना सात लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
इतकेच नाही तर त्याच्या आदल्या वर्षी देखील त्यांनी आले पिकापासून वीस लाखाचे उत्पन्न मिळवले होते.यावर्षी लागवडी पूर्वी त्यांनी शेतामध्ये बेड तयार केले व सेंद्रिय खतांचा वापर करून ठिबक सिंचनाच्या सहाय्याने एकरी नऊ ते दहा क्विंटल बियाणे वापरले व आल्याची लागवड केली.
बायोमी टेक्नॉलॉजीच्या कृषी रसायन साक्षरता प्रशिक्षणाचा झाला शेतीत फायदा
आल्या सोबतच ते कांदा, ऊस व फळबागांमध्ये आंबा या पिकांची देखील फायदेशीर शेती करतात. संग्राम येळवंडे यांना त्यांचे बंधू जे इंजिनियर आहेत त्यांची म्हणजेच धनंजय येळवंडे यांची देखील मोलाची मदत शेतीमध्ये होते.
या प्रयोगशील शेतीत बायोमी टेक्नॉलॉजीच्या कृषी रसायन साक्षरता प्रशिक्षणाचा फायदा झाल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. आज त्यांनी एक प्रकारे आले पिकामध्ये मास्टरी मिळवली असून त्यांच्याकडे परिसरातील अनेक शेतकरी आले पिकाची माहिती व मार्गदर्शन घेण्यासाठी येतात.
पारंपरिक शेतीला फाटा देत आल्यासारख्या पिकाचा यशस्वी प्रयोग त्यांनी केल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यांचे कौतुक देखील केले जाते.