Kadaknath Poultry Farming:- शेतीशी निगडित असलेल्या जोडधंद्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये पूर्वपारपासून पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो व त्या खालोखाल शेळीपालन, कुक्कुटपालन इत्यादी व्यवसाय केले जातात.या तीनही प्रकारचे व्यवसाय जर सध्या बघितले तर यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर आल्याने आता हे व्यवसाय मोठ्या स्तरावर केले जाऊ लागले असून या माध्यमातून शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
यामध्ये जर कुक्कुटपालन व्यवसाय बघितला तर अगोदर शेतकरी देशी कोंबड्यांचे पालन करायचे व हे परसबागेतील कुक्कुटपालन खूप प्रसिद्ध होते.परंतु यामध्ये देखील आता अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आल्याने हा व्यवसाय देखील व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जाऊ लागल्यामुळे मोठमोठे असे पोल्ट्री फार्म आपल्याला उभे राहिल्याचे दिसून येते.
कुकुट पालन व्यवसाय मध्ये ब्रायलर कोंबड्यांचे पालन तसेच लेयर पोल्ट्री फार्मिंग आणि देशी कोंबडी पालन देखिल मोठ्या प्रमाणावर केले जाते. त्यातल्या त्यात देशी कोंबडी पालनातून अनेक शेतकरी अंडी विक्री व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा मिळवताना आपल्याला दिसून येतात.
अगदी आपण या मुद्द्याला धरून जर आपण युवा पोल्ट्री उद्योजक म्हणून ओळखले जाणारे नाशिकचे संदीप सोनवणे यांची यशोगाथा बघितली तर ती प्रेरणादायी आणि इतरांना थक्क करणारी आहे. नाशिक जवळ आडगाव या ठिकाणी संदीप सोनवणे यांचा मोठा पोल्ट्री प्रकल्प असून त्यांनी या प्रकल्पामध्ये कडकनाथ जातीच्या देशी कोंबडीचे पालन केले आहे. त्यांची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
युवा पोल्ट्री उद्योजक संदीप सोनवणे यांची यशोगाथा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नासिक जवळील आडगाव येथे युवा पोल्ट्री उद्योजक म्हणून ओळखले जाणारे संदीप सोनवणे यांचा एक मोठा पोल्ट्री प्रकल्प असून त्यांनी या प्रकल्पामध्ये कडकनाथ जातीच्या देशी कोंबडीचे पालन केले आहे.
जेव्हा त्यांनी कडकनाथ कोंबडी पालन करण्याचे ठरवले तेव्हा झाबुआ या मध्य प्रदेश राज्यातील एका ठिकाणी भेट दिली व त्या ठिकाणी या पक्षांविषयी माहिती घेऊन पूर्ण अभ्यास केला.
त्यानंतर अवघ्या शंभर कोंबड्यांपासून त्यांनी 2016 मध्ये या व्यवसायाला सुरुवात केली व आज व्यवस्थित नियोजन आणि परफेक्ट व्यवस्थापन ठेवून त्यांच्या शेड मधील कडकनाथ कोंबड्यांची संख्या 40000 पर्यंत गेली आहे
व या माध्यमातून दररोज दहा हजार अंड्याचे उत्पादन ते घेतात. या अंड्याची विक्री भारतामध्ये आणि भारताबाहेर देखील केली जाते व या माध्यमातून लाखोत उत्पन्न ते मिळवत आहेत.
अशा पद्धतीने केले आहे अंडी विक्रीचे नियोजन
दररोज दहा हजार अंड्यांचे उत्पादन त्यांना मिळते व या नियोजन त्यांनी नाशिक व मुंबई शहरात केले आहे. ज्याप्रमाणे मागणी असते त्यानुसार वेळेवर अंडे पोहोच करण्यावर त्यांचा मोठ्या प्रमाणावर भर असतो व त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून देखील प्रतिसाद मिळतो.
या सगळ्या विक्री नियोजनामुळे त्यांना हा व्यवसाय वाढवण्यामध्ये मोठी मदत झाली. आज त्यांच्याकडे 40000 पक्षी क्षमता असून या कोंबड्यांना पुरेसे खाद्य उपलब्ध व्हावे याकरिता स्वयंचलित फीड मिल उभारली आहे. इतकंच नाही तर स्वतःची दर महिन्याला 30000 पक्षी पैदास क्षमतेची हॅचरी असून ब्रूडिंग अशी सगळी यंत्रणा त्यांनी त्यांच्या पोल्ट्री फार्मला जोडली आहे.
विशेष म्हणजे तयार खाद्याचे नमुने प्रयोगशाळेमध्ये अभ्यासले जातात व त्यानुसार 18 प्रकारचे घटक निवडून कोंबड्यांसाठी संतुलित असे कोंबड्यांचे खाद्य तयार केले जाते. संतुलित खाद्यामुळे अंडे आणि चिकनची उच्च गुणवत्ता त्यांना मिळते. त्यामुळे कडकनाथ कोंबड्यांच्या अंड्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील एक चांगली मागणी निर्माण केली आहे.
विशेष म्हणजे त्यांच्या कडकनाथ पक्षी पालनासाठी आयएसओ मानांकन देखील मिळाले आहे. त्यांनी पारंपारिक पद्धतीने अंडी विक्री न करता मोठे शहरे तसेच मॉल्स मध्ये मोठ्या प्रमाणावर अंड्यांची विक्री केली जाते व ही विक्री करताना नाविन्यपूर्ण अशी पॅकिंग, ब्रँडिंग या गोष्टींकडे त्यांनी प्रामुख्याने लक्ष दिले असून त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होण्यास मदत झालेली आहे.
संदीप सोनवणे यांनी ग्राहकांना आणि बाजारात हव्या असलेल्या गोष्टींचा विचार करून त्या पद्धतीने सर्व कामात सुधारणा करून व्यवसायात प्रगती केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी उत्पादनाकडे ग्राहक आकर्षित व्हावा म्हणून त्यावर लेबल व इतर माहिती तपशील दिला आहे व त्यामुळे ग्राहकांनी ते वाचले पाहिजे व त्या दृष्टीने पॅकिंग करण्यावर भर दिला.
पॅकिंगमध्ये आकर्षक डिझाईन व रंगसंगती यांचा देखील विचार केला गेला आहे. पॅकिंग व ब्रँडिंगमध्ये त्यांनी विशेष लक्ष दिले असून ग्राहकांनी एकदा उत्पादन विकत घेतले तर त्यांच्या मनामध्ये आपला ब्रँड कायम लक्षात रहावा हा त्यामागचा उद्देश आहे.
त्यांनी त्यांचा व्यवसाय कडकनाथ ऍग्रो वर्ड या नावाने रजिस्टर केला असून कडकनाथ हा ट्रेडमार्क देखील मिळवला आहे. आज दररोज दहा हजार पर्यंत अंड्यांची विक्री ते करतात. कडकनाथच्या या प्रत्येक अंड्यावर ट्रेडमार्कचा शिक्का देखील आहे.
त्या माध्यमातून ग्राहकांना गुणवत्ता व विश्वास तर मिळतोच परंतु पारदर्शकता आणण्याचा देखील त्यांचा प्रयत्न आहे. अंड्याची पॅकिंग ही एक डझन व अर्धा डझन या स्वरूपामध्ये आकर्षक अशा टीन प्रीमियम बॉक्समध्ये केली जाते. एक डझन साडेपाचशे रुपये तर अर्धा डझन साठी तीनशे रुपये असे दर आहेत. अशा पद्धतीने योग्य नियोजन करून लाखो रुपये या माध्यमातून ते कमवत आहेत.