Farmer Success Story:- तंत्रज्ञानाने आज शेती क्षेत्रामध्ये इतका मोठ्या प्रमाणावर बदल केला आहे की आपल्याला कधी कधी विश्वास बसत नाही अशा प्रकारची पिके घेतली जातात. अगदी खडकाळ असलेल्या जमिनीवर देखील आता तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांनी फळबागा लागवड यशस्वी केलेली आहे.
इतकेच नाही तर हिमाचल सारख्या थंड प्रदेशात विकणाऱ्या सफरचंदाची लागवड महाराष्ट्र सारख्या उष्ण वातावरण असलेल्या राज्यात शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवले आहेत. त्यातल्या त्यात अनेक उच्चशिक्षित तरुण-तरुणी आता शेतीमध्ये आल्यामुळे नक्कीच त्यांनी शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात केली व मोठा बदल शेती क्षेत्रामध्ये घडून येताना आपल्याला त्यामुळे दिसत आहे.
तंत्रज्ञानाची मदत आणि योग्य व्यवस्थापन पद्धती यामुळे अगदी कमी क्षेत्रामध्ये देखील लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यामध्ये असे शेतकरी यशस्वी होत आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सोलापूरवाडी या गावचे हनुमंत गावडे व त्यांच्या पत्नी कल्पना गावडे या उच्चशिक्षित दाम्पत्याची यशोगाथा बघितली तर ती इतर तरुण-तरुणींना आणि शेतकऱ्यांना देखील खूप प्रेरणादायी अशी आहे.
या दाम्पत्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने खडकाळ माळरान सारख्या जमिनीवर ड्रॅगन फ्रुट पासून तर सफरचंदापर्यंतच्या फळपिकांची लागवड करून त्यांचे यशस्वीपणे उत्पादन त्यांनी मिळवले आहे.
खडकाळ माळरानावर फुलवले विविध फळबागा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यातील सोलापूरवाडी येथील हनुमंत लक्ष्मण गावडे व त्यांच्या पत्नी कल्पना गावडे हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. कोरोनाच्या अगोदर ते पुण्याचा एक आयटी कंपनीमध्ये उत्तम अशा पगारावर नोकरी करत होते व या ठिकाणी त्यांनी जवळपास चार वर्ष नोकरी केली.
परंतु मध्यंतरी कोरोनाचे संकट आले व त्यांना पुणे सोडून गावी परत यावे लागले. गावी आल्यानंतर आता करावे काय हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. घरचे वडिलोपार्जित तर 50 एकर शेती होती. परंतु त्यातील बरेच क्षेत्र हे माळरानाचे व खडकाळ होते. जेव्हा ते घरी आले होते तेव्हा त्यांचे कंपनीचे काम ते घरून करत होते.
हे काम करत असताना आता गावी आलोच आहोत तर शेती विकसित करावी अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये घोळायला लागले व त्या पद्धतीने त्यांनी शेती डेव्हलप करण्याचा निर्णय घेतला. याकरिता त्यांच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते शिरीष थोरवे यांनी स्वतःकडील पाणी त्यांना उपलब्ध करून दिले व त्यानंतर मात्र त्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करायचे ठरवले.
या प्रयोगांचा भाग म्हणूनच त्यांनी संत्रा आणि सिताफळाची लागवड केली व यशस्वीपणे त्यांचे उत्पादन देखील घेतले. विशेष म्हणजे त्यांना यासगळ्या कामांमध्ये त्यांच्या पत्नी कल्पना गावडे यांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला. हनुमंत गावडे यांच्या वडिलांचे जवळपास 17 वर्षांपूर्वी निधन झाले व तेव्हापासून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आहे व ती जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.
शेतीमध्ये त्यानंतर त्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवड करायची ठरवले व चार वर्षांपूर्वी फलटण येथून ड्रॅगन फ्रुटची रोपे आणून त्याचीही लागवड केली व सफरचंद लागवड करण्याचा निश्चय करून हिमाचल प्रदेशातून सफरचंदाची रोपे आणून त्याची देखील लागवड केली.
विशेष म्हणजे सफरचंद लागवडीचा प्रयोग करणारे ते या भागातील पहिले शेतकरी आहेत. त्यानंतर तीन एकरवर संत्रा व दोन एकर सिताफळ लागवड देखील त्यांनी केली आहे.
यावर्षी त्यांनी सफरचंदामध्ये गहू या पिकाचे आंतरपीक म्हणून अंतर्भाव केला असून माळरान जमिनीवर त्यांनी ड्रॅगन फ्रुट व सफरचंद फुलवली आहे व त्या ठिकाणाची लागवड यशस्वी केल्यानंतर आता दोन एकरवर लागवड सुरू केली आहे.
पाणी व्यवस्थापनासाठी शेततळे ठरले फायद्याचे
हनुमंत गावडे यांचा गावच्या परिसरात पाणीची उपलब्धता खूपच कमी आहे.पाणी उपलब्ध व्हावे याकरिता त्यांनी शेतामध्ये दोन विहिरी व दोन विंधन विहिरी खोदल्या आहेत.
परंतु महत्त्वाचे म्हणजे कृषी विभागाच्या सहाय्याने त्यांनी दोन एकर क्षेत्रामध्ये उंच जागेची निवड करून पावणे तीन कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारले आहे व शेततळे उंच असल्यामुळे कृषी पंपाशिवाय थेट पाईपलाईनचा वापर करून फळ पिकांच्या क्षेत्राला त्यांना पाणी देता येते.
तसेच सोलर युनिटचा देखील त्यांना यामध्ये खूप मोठा फायदा झाला असल्याने विजेच्या खर्चात देखील त्यांची बचत होण्यास मदत झाली आहे.जर त्यांचे फळांचे विक्री व्यवस्थापन बघितले तर पहिल्या वर्षी चार टन ड्रॅगन फ्रुट तसेच यावर्षी पाच टनांपर्यंत ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन त्यांना मिळाले आहे व 110 ते 120 रुपये किलोप्रमाणे दर मिळाला.
ज्याप्रमाणे मागणी असते त्या मागणीनुसार त्यांनी ड्रॅगन फ्रुटची विक्री पुणे तसेच सुरत व नगर या ठिकाणी केली. सफरचंदाची लागवड जरा कमी आहे व दरवर्षाला सात क्विंटल पर्यंत सफरचंदाचे उत्पादन त्यांना मिळत आहे व त्याला 75 ते 100 रुपयापर्यंत दर मिळाला आहे. अशा पद्धतीने त्यांनी मोठ्या कष्टाने व तंत्रज्ञानाचा वापर करत खडकाळ जमिनीवर फळबागांची लागवड यशस्वी करून दाखवली आहे.