कृषी

कमी दिवसात कांद्याचे जास्त उत्पादन देणारा वाण विकसित! 15 मे ते 15 जून दरम्यान विक्रीसाठी होईल उपलब्ध

Onion Variety:- कांद्याची लागवड महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये केली जाते. यामध्ये जर आपण बघितले तर नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड होते व कांद्याच्या सर्वात जास्त बाजारपेठा देखील नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. त्या खालोखाल सोलापूर जिल्ह्यामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

महाराष्ट्रात खरीप तसेच रब्बी हंगामामध्ये कांद्याची लागवड होते. कांद्याचे अनेक वाण सध्या उपलब्ध असून शेतकरी त्यांची पसंती आणि त्यांच्या परिसरात उत्तम उत्पादन देऊ शकणाऱ्या अशा वाणाची लागवड करत असतात.

परंतु आता खरीप हंगामामध्ये लागवड करता येईल व कमी दिवसात जास्त उत्पन्न देईल असे एक नवीन वाण नाशिकच्या राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्राने विकसित केले असून दहा वर्ष यासाठी संशोधन करण्यात आले व अखेर त्याला आता यश मिळाले आहे.

त्यामुळे नक्कीच या वाणामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार हे मात्र निश्चित. कोणत्याही राज्यामध्ये या व्हरायटीची लागवड करता येणे शक्य होणार आहे व केंद्र सरकारने या वाणाला मान्यता दिली आहे व लवकरच त्याला नाव देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर एक विशेष बैठक देखील होणार आहे.

हेक्टरी तीनशे ते साडेतीनशे क्विंटल पर्यंत उत्पादन मिळण्याचा करण्यात आला आहे दावा
कांद्याच्या या नवीन विकसित करण्यात आलेल्या वाणापासून हेक्टरी तीनशे ते साडेतीनशे क्विंटल पर्यंत उत्पादन येत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. जर आपण नाशिकच्या राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर 1987 मध्ये याच केंद्राने ऍग्रो फाउंड डार्क रेड हा कांद्याचा प्रसिद्ध असलेला वाण विकसित केला होता.

आता या केंद्राने हे खरीपासाठी संशोधित आणि विकसित केलेले दुसरे वाण आहे. याची विक्री येत्या 15 मे ते 15 जून दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व निफाड तालुक्यातील चितेगाव व कुंदेवाडी येथे सुरू होणार असून जास्त पावसामुळे कांदा उत्पादनात घट येण्याची भीती शेतकऱ्यांना असते व त्यामुळे आता खरिपात कांदा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत नाही.

परंतु हे वाण लवकर काढणीला येणारे असल्याने शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. कांद्याचे हे वाण महाराष्ट्र, राजस्थान तसेच मध्य प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश राज्याच्या काही भागात लागवड करता येणार आहे.

काय आहे कॉल 88( तात्पुरते नाव) वाणाचे वैशिष्ट्ये?
कांद्याचा हा वाण हलका लाल रंगाचा असून लागवडीनंतर साधारणपणे उत्पादन कालावधी हा 80 दिवसाचा आहे. तसेच उत्पादनाच्या बाबतीत बघितले तर शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की हेक्टरी यापासून 300 ते 350 क्विंटल उत्पादन मिळू शकते.

या नव्याने विकसित करण्यात आलेल्या कांद्याच्या नव्या वाणाच्या तुलनेत जर आपण याच केंद्राने विकसित केलेले यापूर्वीचे ऍग्रो फाउंड वाणाची तुलना केली तर या वाणाचा कांदा हा गर्द लाल रंगाचा असतो. तसेच लागवडीनंतर साधारणपणे 90 ते 100 दिवसात काढणीस तयार होतो हेक्टरी 250 ते 300 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts