कृषी

नेवासा तालुक्यातील युवा शेतकऱ्याने टरबूज लागवडीतुन मिळवला 55 ते 60 दिवसात एकरी 3 लाखांचा नफा! जाणून घ्या टरबुजाचे भन्नाट नियोजन

Farmer Success Story:- तंत्रज्ञानाच्या मदतीने आता कुठलीही अशक्य गोष्ट आता शक्य होऊ लागली आहे हे आपल्याला माहिती आहे.ज्या गोष्टी अगोदर खूपच कठीण किंवा अशक्य वाटत होत्या त्या आता तंत्रज्ञानामुळे चुटकीसरशी होणे शक्य झाले आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आता तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला आहे व याला आता कृषीक्षेत्र देखील अपवाद नाही.

त्यामुळे आता शेतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी कमीत कमी क्षेत्रामध्ये लाखोत उत्पन्न मिळवत आहेत. तसेच पारंपारिक शेतीच्या पद्धती आणि पारंपारिक पिकांच्या लागवडीपासून शेतकरी आता दूर गेले असून अत्याधुनिक अशी शेती पद्धती व वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीतून लाखोत नफा मिळवताना दिसून येत आहेत.

या मुद्द्याला धरून जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या खुणेगाव येथील काकासाहेब शंकर कदम या युवा शेतकऱ्याचे उदाहरण पाहिले तर या शेतकऱ्याने टरबूज लागवडीतून लाखोत नफा मिळवण्याची किमया साध्य केली आहे. ते वर्षभर टरबुजाचे पीक घेतात व त्यामुळे त्यांना टरबूज पिकाच्या बाबतीत हातखंडा तयार झाला आहे.

टरबूज पिकातून एकरी मिळवला तीन लाखांचा नफा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या खूणेगाव येथील प्रगतिशील आणि युवा शेतकरी काकासाहेब शंकर कदम यांनी एकरी टरबुजाचे 35 ते 40 टन उत्पादन मिळवले. याकरिता त्यांनी एकूण 90 हजार रुपये खर्च केला व 90 हजार रुपये खर्च करून त्यांना चार लाखांचे उत्पन्न यातून मिळवले.

अशा पद्धतीने 90 हजार रुपये खर्च वजा जाता त्यांना निव्वळ नफा तीन लाखांचा मिळाला. विशेष म्हणजे त्यांचे हे पीक अवघ्या 55 ते 60 दिवसाच्या कालावधीत तयार झाले. काकासाहेब हे वर्षभर टरबुजाचे पीक घेतात. नेवासा तालुका म्हटले म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उसाचे उत्पादन घेतले जाते.

परंतु उसाचा वाढत असलेला उत्पादन खर्च व त्यातून मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने या परिसरातील शेतकरी आता इतर पिकांकडे वळू लागले आहेत. त्यामुळे काकासाहेब कदम हे दरवर्षी शेतात चार एकर वर दोन-दोन एकर अशी विभागणी करून आलटून पालटून टरबुजाचे पीक घेत असतात.

यावर्षी देखील त्यांनी टरबूज लागवडीसाठी एकरी 6000 रुपये खर्च करून टरबुजाची रोपे विकत आणली व त्यांची लागवड केली. तसेच या लागवडीकरिता बेड व मल्चिंग तसेच ठिबक सिंचनाचा वापर करून सहा बाय एक फूट अंतरावर टरबूज रोपांची लागवड केली. जानेवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पीक पूर्ण होत असते.

परागीभवनाकरिता ते इटालियन मधमाशा वापर करतात व शेतामध्ये या पेट्या ठेवतात. तसेच योग्य कीटक व बुरशीनाशकांची फवारणी केली जाते. रमजान अगोदर फळ पूर्ण तयार होण्याकडे त्यांचा कल असतो व नऊ किलोपर्यंत एक एक टरबुजाचे वजन भरते व त्यामुळे त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.

यावेळेस मिळाला दहा रुपये प्रति किलोचा दर
काकासाहेब हे टरबुजाची विक्री जम्मू तसेच गुजरात, कोलकाता व मुंबई येथील वाशी मार्केटमध्ये करतात व यावेळेस त्यांनी दहा रुपये किलोप्रमाणे मिळालेल्या 35 ते 40 टन टरबुजाची विक्री केली. 90 हजार रुपये खर्च वजा जाता त्यांना तीन लाख रुपये एकरी इतका निव्वळ नफा मिळाला.

जर व्यवस्थित उत्पादन मिळवायचे असेल तर पिकाला वेळच्यावेळी फवारणी तसेच विद्राव्य खतांचा पुरवठा केल्यास कुठल्याही फळ पिकातून किंवा टरबूजातून चांगले उत्पन्न मिळते. काकासाहेब हे आलटून पालटून टरबुजाचे दोन पिके घेतात व टरबुजाच्या पिकातून चांगले उत्पन्न मिळवतात.त्यांनी केलेला खर्च जर बघितला तर जमिनीची पूर्व मशागत तसेच ठिबक,

आवश्यक असलेला खतांचा बेसल डोस तसेच मल्चिंग पेपर, इतर मजुरी व लागवड खर्च, पिकावरील फवारणी यास एकरी 50 हजार रुपये खर्च त्यांना आला व अठरा हजार रुपये खर्च करून त्यांनी सहा हजार रोपे विकत आणली आणि त्यासोबतच विद्राव्य खतांचा पंधरा हजार रुपयाचा खर्च मिळून 80 ते 90 हजार रुपये एकरी उत्पादन खर्च त्यांना आला.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts