कृषी क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने अनेक महत्त्वपूर्ण बदल कृषी क्षेत्रामध्ये करता येणे आता शेतकऱ्यांना शक्य होत आहे. तसेच हवामान बदलावर आधारित पिक पद्धती व त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत अनेक प्रकारच्या भाजीपाला पिके व फळबागांच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधताना आपल्याला दिसून येत आहेत.
आता जर आपण भारताचा विचार केला तर भारतामधील काही विशिष्ट पिके असे आहेत की त्या पिकांचे उत्पादन हे विशिष्ट राज्यांपुरतेच मर्यादित आहे व अशा पिकांमध्ये उत्तम उदाहरण घ्यायचे झाले तर आपल्याला सफरचंद या फळपिकाचे घेता येईल. आपल्याला माहित आहे की सफरचंद हे पीक प्रामुख्याने थंड वातावरणामध्ये म्हणजे हिमाचल तसेच जम्मू-काश्मीर सारखे राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होते.
परंतु गेल्या एक ते दोन वर्षाचा विचार केला तर महाराष्ट्र सारख्या समशीतोष्ण वातावरण असलेल्या राज्यांमध्ये देखील आता शेतकरी सफरचंदाची लागवड यशस्वी करू लागली आहेत व ही किमया साध्य झाली आहे ती तंत्रज्ञानाच्या आणि हवामान बदलाच्या आधारावर केलेल्या पिक पद्धतीत बदलामुळे.
याच मुद्द्याला धरून जर आपण प्रामुख्याने ऊस पट्टा म्हणून ओळखला जाणारा नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील देडगाव येथील आदिनाथ मुंगसे या शेतकऱ्याने चक्क सफरचंदाची लागवड यशस्वी करून दाखवली असून त्याचे उत्पादन देखील मिळायला त्यांना सुरुवात झालेली आहे.
नेवासा तालुक्यात सफरचंदाची लागवड यशस्वी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उस हे प्रमुख पीक असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या देडगाव या गावचे रहिवासी असलेले आदिनाथ मुंगसे या शेतकऱ्याने चक्क सफरचंदाची लागवड यशस्वी करून दाखवली असून संपूर्ण परिसरातील शेतकरी या सफरचंदाच्या बागेला कुतूहलाने भेट देताना आपल्याला दिसून येत
असून हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे सफरचंदाला जे काही वातावरण आवश्यक असते या प्रकारचे थोडे देखील वातावरण नसताना देखील आदिनाथ मुंगसे यांनी ही किमया लीलया पार पाडली आहे.
अशा पद्धतीने घेतला सफरचंद लागवडीचा निर्णय
सफरचंद म्हटले म्हणजे प्रामुख्याने हिमाचल आणि काश्मीर सारख्या थंड वातावरण असलेल्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकते. परंतु नेवासा परिसरातील वातावरण संपूर्णपणे याच्या विपरीत असताना देखील त्यांनी सफरचंद लागवडीचा निर्णय घेतला.
आदिनाथ हे प्रयोगशील शेतकरी असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये आले की आपल्याकडे सफरचंदाचे पीक का येऊ शकणार नाही? याचा संपूर्णपणे विचार व अभ्यास करून त्यांनी सफरचंदाची लागवड करण्याचे ठरवले व प्रत्यक्षात लागवड करून सफरचंदाची बाग यशस्वी करून दाखवली.
सध्या मिळत आहे सफरचंदाचे उत्पादन
याबाबत माहिती देताना आदिनाथ मुंगसे यांनी सांगितले की, मागच्या वर्षी जी काही अतिवृष्टी झाली होती त्यामुळे नुकसान झाले होते.परंतु यावर्षी प्रत्येक झाडाला साधारणपणे दहा किलो पर्यंत फळे लगडलेली आहेत. सफरचंदांना रंग व चमक देखील चांगली असून चव देखील उत्तम असल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्यांच्या या सफरचंदाच्या बागेचे अप्रूप वाटत आहे.
एवढेच नाही तर त्यांनी पिकवलेली ही दर्जेदार ताजी सफरचंद विकत घेण्यासाठी चक्क बागेमध्ये येऊन ग्राहक सफरचंदाची खरेदी करत आहेत व त्यासोबतच व्यापारी देखील जागेवर शंभर रुपये प्रति किलो प्रमाणे सफरचंदाची खरेदी करत आहेत. विशेष म्हणजे पहिल्याच तोड्यात त्यांनी अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
किती रोपे लावली आणि किती आला खर्च?
आदिनाथ मुंगसे यांनी त्यांच्या शेतामध्ये 250 रोपांच्या लागवडीकरिता 65 हजार रुपयांचा खर्च केला असून गेल्या तीन वर्षापासून ते बागेचे व्यवस्थापन करत आहेत व त्या बागेला पंचवीस हजार रुपये शेणखतासाठी खर्च आला असून खुरपणी इतर आवश्यक खर्च एक लाख रुपये आला आहे.
साधारणपणे आदिनाथ मुंगसे यांनी 2021 मध्ये हिमाचल प्रदेशात राज्यातून हार्मोन 99 या जातीचे 250 सफरचंदाची रोपे आणली होती व 30 गुंठ्यामध्ये लागवड केली. कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा या बागेला वापर न करता निव्वळ शेणखताच्या जोरावर त्यांनी ही बाग फुलवली असून तिसऱ्या वर्षी सफरचंदाच्या झाडांना फळधारणा झालेली आहे.