Gavran Poultry Farming:- शेती आणि शेतीशी निगडित असलेले जोडधंदे हे पूर्वापार भारतीय शेतकरी करत आला आहे. जोडधंदयाच्या बाबतीत बघितले तर ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या दारापुढे एक तरी शेळी आपल्याला दिसून यायची किंवा घराच्या परसबागेत दोन ते चार गावरान कोंबड्या दाणे टिपताना दिसायच्या.
परंतु आता शेळीपालन असो किंवा कुक्कुट पालन यामध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाने शिरकाव केला असल्यामुळे खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्टिकोनातून हे व्यवसाय आता शेतकरी करू लागले आहेत. त्यातल्या त्यात आताची तरुण पिढी शेतीमध्ये आल्याने त्यांनी देखील अनेक जोडधंद्यांवर भर दिला असून प्रामुख्याने कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
त्यामध्ये बॉयलर कोंबड्यांच्या पालनापासून तर गावरान कोंबडी पालनाचे मोठमोठे सोयीसुविधांनी युक्त असे शेड दिसून येतात व या माध्यमातून तरुणाई आता लाखो रुपये कमवतांना दिसून येत आहे.
अगदी याच गावरान कोंबडी पालनाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर इंदापूर तालुक्यातील कळस या गावचा तरुण महावीर खारतोडे यांनी इंजिनिअरिंग पूर्ण करून नोकरी न करता गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय करण्याचे ठरवले व त्यातूनच मोठ्या प्रमाणावर आर्थिक समृद्धी मिळवली आहे. त्याने गावरान कोंबडी पालनाचे नीटनेटके व अचूक असे व्यवस्थापन ठेवले असून या माध्यमातून तो मोठ्या प्रमाणावर पैसा मिळवत आहे.
महावीर खारतोडे या तरुणाने गावरान कोंबडी पालनातून साधली आर्थिक समृद्धी
याबाबत सविस्तर वृत्त असे की,इंदापूर तालुक्यातील कळस या गावचा रहिवासी असलेला महावीर गजानन खारतोडे या तरुणाने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले व नोकरीच्या मागे न लागता गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय करायचे ठरवले व व्यवसायाला सुरुवात केली.
विशेष म्हणजे अल्पावधीतच या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण कुटुंबाला एक आर्थिक स्थैर्य मिळवून दिले व महिन्याला लाखो रुपये कमवण्याची कीमया देखील त्याने साध्य केली आहे. महावीर यांनी या कोंबडी पालनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केल्याचे आपल्याला दिसून येते.
आपल्याला माहित आहे की गावरान कोंबडी पालनामध्ये कोंबडी बसवून त्या माध्यमातून पिल्लांचा जन्म होतो अशी एक प्रक्रिया असते. परंतु एका कोंबडी पासून पिल्लांना जन्म देण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मर्यादा येत
असल्यामुळे एका वेळेलाच हजारो पिल्लाना जन्म देण्याचे यंत्र त्यांनी स्वतः विकसित केले व त्यामुळेच त्याच्या व्यवसायाची मोठ्या प्रमाणावर भरभराट होऊ शकली. सध्या हा तरुण गावरान कोंबडीचे पिल्लांची विक्री करतो तसेच अंडी व कोंबड्यांच्या विक्रीतून महिन्याला दीड ते दोन लाखांचे उत्पन्न आरामात मिळवत आहे.
अशाप्रकारे केले आहे गावरान कोंबड्यांचे व्यवस्थापन
महावीर खारतोडे यांनी गावरान कोंबड्यांचे व्यवस्थापन करताना मुक्त संचार पद्धतीवर जोर दिल्याचे दिसून येते. कोंबड्यांना मुक्तपणे फिरता यावे याकरिता त्याने एक एकर शेतीला तारेचे कुंपण केले असून त्या शेतामध्ये आंबा तसेच शेवग्याची झाडे लावली आहे.
तसेच संध्याकाळी शेडमध्ये कोंबड्यांना बसता यावे याकरिता बांबूंचा वापर करून त्यांच्या माळा तयार केल्या आहेत. तसेच पाणी व्यवस्थापन करताना शुद्ध पाण्याचा पुरवठा या गोष्टीवर जोर दिल्यामुळे त्यांच्या शेडमध्ये आज निरोगी कोंबड्या पाहायला मिळतात.
विशेष म्हणजे महावीर खारतोडे यांनी घरच्या कोंबड्यांपासून गावरान कोंबडी पालन व्यवसायला सुरुवात केली व घरच्या ज्या कोंबड्या होत्या त्यांच्या अंड्यांपासून सुरुवात करून आज त्यांच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांची संख्या वाढली आहे.
सध्या विक्री योग्य 600 पेक्षा जास्त कोंबड्या त्यांच्या शेडमध्ये उपलब्ध असून ग्राहकांच्या मागणीनुसार पिल्लांची निर्मिती देखील महावीर खारतोडे करतो. म्हणजेच पिल्लांची तसेच कोंबड्यांची व अंड्याची विक्री या माध्यमातून महिन्याला लाख ते दीड लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न महावीर अगदी आरामात मिळवत आहे.