Ahmednagar Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून भारतातील पीक पद्धतीत मोठा बदल झाला आहे. शेतकऱ्यांनी आता पारंपारिक पीक पद्धतीला बगल देत फळ पीक लागवडीला प्राधान्य दाखवले आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात फळपीक लागवड होत आहे. डाळिंब, द्राक्ष, केळी यांसारख्या विविध पिकांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील डाळिंब लागवडीतून आर्थिक प्रगती साधली आहे. या शेतकऱ्याने अवघ्या चार एकर जमिनीतून 51 लाख रुपयांची कमाई केली आहे. सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची पंचक्रोशीत मोठी चर्चा पाहायला मिळतेय.
तालुक्यातील हंगेवाडी येथील संतोष रायकर यांनी ही किमया साधली आहे. संतोष यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे चार एकर जमीन आहे. या जमिनीत रायकर कुटुंब फार पूर्वीपासून पारंपारिक पिकांची शेती करत होते. मात्र पारंपारिक पिकांच्या शेतीमधून अपेक्षित कमाई होत नव्हती.
यामुळे संतोष रायकर यांनी पीक पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आणि डाळिंब लागवड केली. डाळिंब लागवडीनंतर झाडांची चांगली काळजी घेतली. तज्ञांच्या सल्ल्याने वेळोवेळी औषध फवारणी आणि खतांचा डोस दिला.
यामुळे त्यांना चार एकर जमिनीत लागवड केलेल्या डाळिंब पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळाले. या डाळिंबाच्या बागेतून त्यांनी तब्बल 51 लाख रुपयांची कमाई करून दाखवली आहे. विशेष म्हणजे या पैशातून त्यांनी त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न ही पूर्ण केले आहे.
त्यांनी त्यांच्या गावात टोलेजंग इमारत बांधली असून हे सर्व डाळिंबामुळे शक्य झाले असल्याने त्यांनी आपल्या बंगल्यावर डाळिंबाच्या झाडाची प्रतिकृती देखील तयार केली आहे. यामुळे रायकर यांच्या डाळिंबाच्या शेतीची तर चर्चा होतच आहे शिवाय त्यांनी बांधलेल्या बंगल्याची देखील परिसरात खूपच चर्चा आहे.
खरे तर राज्यातील अनेक शेतकरी बांधव शेतीमधून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने त्रस्त आहेत. शेतीमधून चांगले उत्पादन मिळाले तर बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही म्हणून तक्रार करत आहेत.
पण, शेतीमध्ये जर शेतकऱ्यांनी वेगळी वाट धरली, फळपीक लागवड केली तर शेतीतून लाखोंची कमाई होऊ शकते हेच रायकर यांनी आपल्या प्रयोगातून जगाला दाखवून दिले आहे. रायकर यांचा हा प्रयोग इतरांसाठी देखील मार्गदर्शक आहे.