Crop Loan : पिक कर्ज वेळेवर मिळणे हे शेतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. कारण याच कर्जाच्या पाठिंब्यावर शेतकरी शेतीची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकतात व निश्चितच याचा सकारात्मक परिणाम हा उत्पादन वाढीवर दिसून येतो. परंतु बऱ्याचदा शेतकऱ्यांना पीक कर्जाकरिता बँकांचे उंबरे झिजवावे लागतात.
परंतु वेळेत शेतकऱ्यांना बऱ्याचदा कर्ज मिळत नसल्यामुळे शेतीची कामे वेळेवर करण्याकरिता व इतर आर्थिक गरजा भागवण्याकरिता त्यांना सावकाराच्या दाराशी जावे लागते. तसे कर्जाच्या बाबतीत विचार केला तर जिल्हा बँकांशी शेतकऱ्यांचे आर्थिक दृष्टिकोनातून खूप जवळचे नाते आहे असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही.
याच जिल्हा बँकेच्या बाबतीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 26 जुलै रोजी एक बैठक घेऊन बुलढाणा जिल्हा बँकेच्या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता दिली असून आता शेतकऱ्यांना ताबडतोब कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य बँकेला काय दिले निर्देश?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आर्थिक अडचणीत असलेल्या बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेला तीनशे कोटी रुपयांचे सॉफ्ट लोन मिळण्याचा आता मार्ग मोकळा झाला असून बँकेच्या या संबंधीच्या प्रस्तावाला राज्याच्या अर्थमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली आहे.
तसेच राज्य बँकेला शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. बँकेला आता तीनशे कोटींचे कर्ज मंजूर झाल्यामुळे याचा फायदा आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होईल. तीनशे कोटी कर्ज बँकेला मंजूर झाल्यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना कर्ज वाटप करणे बँकेला सोपे जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.