कृषी

बळीराजांमध्ये आनंदाचे वातावरण ; शेवगाव तालुक्यातील ‘त्या’ गावांना मिळणार चार वर्षांपूर्वी झालेल्या नुकसानीची भरपाई ! फक्त दोनच दिवसात…

१ जानेवारी २०२५ शेवगाव : सुमारे चार वर्षापूर्वी २०२१ च्या पावसाळ्यात नद्यांना पूर आल्याने नुकसान झालेल्या तालुक्यातील १३ गावांतील बाधित शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसात नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्यात येईल,अशी माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली.

तालुक्यातील संबंधित तेरा गावचे शेतकरी तसेच शेतकरी कृषी समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी तहसील कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत तहसीलदार सांगडे बोलत होते.

सन २०२१ च्या पावसाळ्यातील ऑगस्ट सप्टेबर महिन्यात शेवगाव तालुक्यातील जोहरापूर, वडुले बुद्रुक सह आखेगाव, आखेगाव तितरफा, खरडगाव, वरूर बुद्रुक, वरूर खुर्द, भगूर, शेवगाव, जोहरापूर, कांबी, हातगाव, गायकवाड जळगाव, आशा १३ गावांतील नद्यांना पूर आला होता.पुराचे पाणी नदी किनारी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने शेतकऱ्यांच्या शेतजमिनी, घरे, विहिरी, शेळ्या, मेंढया गुरेढोरे, संसारोपयोगी साहित्याचे अनोनात नुकसान झाले होते.

यामुळे अनेकांचे संसार उघडयावर आले.याबाबत महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त पंचनाम्यानुसार विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकसान भरपाई अनुदान वर्ग करण्याचा अहवाल सादर करण्यात आला होता.

यापैकी काही पूरग्रस्त गावांतील बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीची तुटपुंजी भरपाई यापूर्वीच अदा करण्यात आल्याची माहिती असून, बाधितांना पशुधन, विहिरी व घरांच्या पडझडीची नुकसान भरपाई जवळपास चार वर्षानंतर ही मिळाली नाही.

त्यामुळे शेतकरी कृषी समितीचे दत्तात्रय फुंदे, कॉ. संजय नांगरे, रामकिसन कराड, भाऊ बैरागी यांच्यासह संबंधित गावांतील शेतकऱ्यांनी तहसीलदार प्रशांत सांगडे व संबंधितांना निवेदन देऊन दि. २५ जानेवारी पर्यंत रखडलेली नुकसान भरपाई मिळावी अन्यथा शेतकरी आंदोलनाचा निर्धार जाहीर केला होता.

त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार सांगडे यांनी मंगळवारी तहसील कार्यालयात पार पडलेल्या समन्वय बैठकीत तातडीने विविध गावांतील ५६ शेतकऱ्यांना त्यांच्या अन्नधान्य व संसारोपयोगी साहित्याची नुकसान भरपाईची रक्कम येत्या दोन दिवसांत वितरित करण्याचे मान्य केले.

तसेच शेतकऱ्यांची जनावरे व मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे पंचनामे दोन दिवसांपूर्वी महसूल विभागाकडे प्राप्त झाल्याने याबाबत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार पुढील कार्यवाही करण्याचे त्यांनी मान्य केले.

Sushant Kulkarni

Published by
Sushant Kulkarni

Recent Posts