कृषी

मोठी बातमी ! सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार येत्या महिन्याभरात मदत ; 3500 कोटींचे आले प्रस्ताव

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी घातक ठरला आहे. मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस खूपच उशिरा आला. नंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बहुतांशी पीक वाया गेले. यातून जे थोडेफार बचावलेले पीक होते ते सततच्या पावसामुळे आणि परतीच्या पावसामुळे खराब झाले.

म्हणजेच शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास गेला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत मिळणे अपेक्षित होते. आता सततच्या पावसामुळे नुकसानी पोटी 3500 कोटींचे प्रस्ताव सरकारकडे सादर झाले आहेत. अशा शेतकऱ्यांना आता एक महिन्याच्या आत मदत देण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.

याशिवाय पुढील वर्षीपासून सततच्या पावसामुळे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान होते ते ठरवण्यासाठी काही निकष घालून देण्यात येणार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली. जालना जिल्ह्यातील अंबड बदनापूर चे भाजप आमदार नारायण कुचे यांनी अतिवृष्टी बाबत एक लक्षवेधी सूचना मांडली होती त्याच्या उत्तरात देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.

या सूचनेत बदनापूर येथील काही महसूल मंडळातील गावाच्या अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना निकषातून वगळण्यात आले. विशेष म्हणजे काही ठिकाणी याचे पंचनामे झाले मात्र शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचे नमूद करण्यात आले.

तसेच भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठवले असून तेथून ते मंत्रालयात पाठवण्यात आले आहेत ; मात्र यावर अजून कोणती कार्यवाही झालेली नाही, असा मुद्दा उपस्थित केला. यावर सरकारकडून सततच्या पावसामुळे नुकसानीचे निकष ठरवण्यासाठी समितीची स्थापना झाल्याचे सांगितले गेले.

तसेच याआधी सततच्या पावसाच्या नुकसानीची संकल्पना नव्हती. 65 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला तरच मदत मिळते. मात्र वर्तमान सरकारने अतिरिक्त बोजा स्वीकारून सततच्या पावसाने नुकसान झाले असले तरीदेखील पंचनामे केले आहेत, पुरवणी मागण्यांमध्ये मदतीची तरतूद केली आहे.

तसेच पुढील एक महिन्यात ही मदत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. निश्चितच जे शेतकरी बांधव अतिवृष्टीच्या निकषात बसत नाही मात्र त्यांचे प्रत्यक्षात नुकसान झाले आहे अशा शेतकरी बांधवांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

पुरवण्या मागण्यांद्वारे या शेतकऱ्यांसाठी मदतीचा प्रस्ताव सादर झाला असून पुढील महिन्यापासून अशा शेतकऱ्यांना मदत मिळेल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले असल्याने संबंधित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts