Banana Farming:- महाराष्ट्र म्हटला म्हणजे प्रत्येक जिल्हा हा वेगवेगळ्या पिकांसाठी ओळखला जातो. विभागांचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागांमध्ये प्रामुख्याने उसाचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते व त्या खालोखाल विविध प्रकारच्या फळबागांची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर होते.
नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर द्राक्ष आणि कांदा व त्या खालोखाल डाळिंब या फळबागासाठी नाशिकची ओळख आहे. साधारणपणे खानदेश हा महाराष्ट्रातील परिसर पाहिला तर यामध्ये जळगाव,धुळे,नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो व या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते व खास करून जळगाव जिल्ह्याला केळीचे आगार म्हणून संबोधले जाते.
तसेच सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर प्रामुख्याने डाळिंब या फळ पिकासाठी सोलापूरची ओळख आहे. परंतु या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एका शेतकऱ्याने केळीची लागवड करून तब्बल 81 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. नेमकी केळीच्या शेतीतून या शेतकऱ्यांनी एवढा प्रचंड प्रमाणात नफा कसा मिळवला? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
जोखीम पत्करून केळीच्या शेतीतून मिळवले लाखोत उत्पन्न
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा हा प्रामुख्याने डाळिंब उत्पादक क्षेत्र म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे या ठिकाणच्या डाळिंबाला जीआय टॅग देखील मिळालेला आहे. परंतु याच सांगोला तालुक्यातील प्रताप लेंडवे नावाच्या शेतकऱ्याने डाळिंबाची शेती अगोदर करत असतानाच डाळिंबावर विविध रोगांचा सामना करावा लागत असल्यामुळे उत्पादन खर्च निघणे देखील कठीण झालेले होते.
मध्यंतरीच्या कालावधीत त्यांच्या एका मित्राच्या सल्ल्यावरून त्यांनी केळीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. केळी लागवड करावी या उद्देशाने त्यांनी सहा एकरमध्ये केळी पिकाचे लागवडीचे नियोजन केले. प्रतिरोप 125 रोपे खर्च त्यांना आला व सहा एकर मध्ये त्यांनी नऊ लाख रुपये खर्च करून केळीची रोपे लावली. केळीचे लागवड केल्यानंतर अवघ्या नऊ महिन्यांमध्येच त्यांना केळीचे उत्पन्न मिळायला लागले व या पिकातून त्यांनी एकूण 90 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
प्रताप लेंडवे यांनी सहा एकरमध्ये केलेल्या केळीच्या लागवडीतून त्यांना एका एकर मध्ये 50 टन केळीचे उत्पादन मिळाले. या हिशोबाने तीनशे टन सहा एकर मध्ये केळीचे उत्पादन मिळवले. या केळीची विक्री त्यांनी जम्मू-काश्मीरमधील व्यापाऱ्यांना 35 रुपये किलो दराने केली व या सहा एकर मधून त्यांना साधारणपणे 90 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. प्रताप लेंडवे याबाबत म्हणतात की शाश्रोक्त पद्धतीने केळीची लागवड केल्यामुळे हे शक्य झाले तसेच ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्थित व्यवस्थापन केले.
प्रताप लेंडवे यांनी पिकवलेल्या केळीच्या घडाचे वजन 55 ते 60 किलो पर्यंत आले.प्रताप लेंडवे यांनी केळी लागवडीमध्ये जोखीम पत्करली व डाळिंब ऐवजी केळीची लागवड करण्याचा निर्णय घेतला व या जोखमीचे फळ देखील त्यांना चांगले मिळाले. खर्च वजा जाता केळीच्या शेतातून त्यांना नऊ महिन्यांमध्ये 81 लाख रुपयांची कमाई झाली.
अशा पद्धतीने प्रताप लेंडवे यांच्या उदाहरणावरून आपण पाहू शकतो की कुठल्याही क्षेत्रांमध्ये जोखीम पत्करल्याशिवाय आणि व्यवस्थित नियोजनाशिवाय व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही. रुळलेली चाकोरी सोडून वेगळ्या मार्गाने काही करायचे असेल तर जिद्द आणि इच्छाशक्ती असावी लागते तरच माणूस यशस्वी होतो हे प्रताप लेंडवे यांच्या उदाहरणावरून दिसून येते.