Chili Farming : भारतीय वैज्ञानिक शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या अनुषंगाने कायमच वेगवेगळे संशोधन करत असतात. भारतीय संशोधक पिकांच्या वेगवेगळ्या जाती विकसित करतात जेणेकरून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळेल आणि त्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त करता येणे शक्य होईल. आता याच क्रमात वाराणसी येथील ICAR- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च या संस्थेने मिरचीची एक अद्भुत जात विकसित केली आहे.
अद्भुत असण्यामागे कारण असं की नव्याने विकसित झालेली ही मिरचीची जात फक्त खाण्यासाठीच नव्हे तर या नव्याने विकसित झालेल्या मिरचीचा उपयोग सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी देखील केला जाऊ शकणार आहे. असा दावा करण्यात आला आहे की या नवीन जातीच्या मिरचीच्या पावडरचा उपयोग हा सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी बिनधास्त केला जाऊ शकणार आहे.
त्यामुळे सध्या भारतीय संशोधकांच्या या शोधाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आज आपण देखील भारतीय संशोधकांनी विकसित केलेली नवीन मिरचीच्या या जातीविषयी सविस्तर पण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
उत्तर प्रदेश राज्यातील ICAR- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च संस्थेने नव्याने विकसित केलेल्या मिरचीच्या जातीच वीपीबीसी-535 (काशी सिंदुरी) असं नामकरण करण्यात आल आहे. चला तर मग जाणून घेऊया वीपीबीसी-535 या मिरचीच्या जातीची विशेषता.
आता या जातीबद्दल जाणून घ्या-
VPBC-535 जातीमध्ये 15 टक्के ओलिओरेसिन असते. ही जात सामान्य मिरचीपेक्षा जास्त उत्पादन देते. कारण यामध्ये अधिक खतांचा वापर केला जातो.
या मिरचीच्या लागवडीसाठी हेक्टरी 400 ते 500 ग्रॅम बियाणे लागते, सर्व बाबी लक्षात घेतल्यास हेक्टरी 150 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते.
रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात याची लागवड करता येते.
या जातीची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करण्याचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांनी जुलै/ऑगस्ट महिन्यात रोपवाटिका तयार करावी.
या जातीच्या मिरचीचा रंग पिकल्यानंतर लाल होतो.
त्यात ओलिओरेसिन नावाचा औषधी गुणधर्म देखील आहे. सिंदूरी काशी मिरचीमध्ये रंगीत रंगद्रव्ये आहेत ज्याचा वापर भाजीपाला तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये लिपस्टिक बनवण्यासाठी करता येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सिंथेटिक रंगांच्या हानिकारक प्रभावापासून करोडो नागरिकांचे रक्षण होणार आहे.
शेत कसे तयार करावे-
शेत तयार करताना हेक्टरी 20-30 टन कंपोस्ट किंवा शेणखत वापरावे. यानंतर मिरचीच्या बिया पेरल्या जातात. पेरणीनंतर 30 दिवसांनी झाडे 45 सेमी अंतरावर लावावीत, जेणेकरून झाडांमधील अंतर राखले जाईल. प्रत्येक ओळीत 60 सेमी अंतर असावे. या मिरचीच्या लागवडीसाठी अधिक खतांचा वापर केला जातो. मिरचीला 120 किलो नायट्रोजन, 80 किलो स्फुरद आणि 80 किलो पालाश प्रति हेक्टरी लागते.
या जातीची झाडे पसरट आहेत, ती अँथ्रॅकनोज रोगास प्रतिरोधक आहे. मिरचीची फळे पेरणीनंतर 95-100 दिवसांत पिकतात आणि त्याची फळे 10-12 सेमी लांब आणि 1.1-1.3 सेमी जाडीची असतात. त्याचे सरासरी उत्पादन 140 क्विंटल प्रति हेक्टर आहे. या मिरचीला बाजारात जास्त भाव मिळतो. जिथे सामान्य मिरची ३० रुपये किलोपर्यंत विकली जाते, तर काशीचा सिंदूर मिरची ९० रुपये किलोपर्यंत विकली जाऊ शकते.
आम्ही तुम्हाला सांगु इच्छितो की, काशी सिंदूरी जातीचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी तसेच सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे हर्बल कॉस्मेटिक उद्योगात त्याची मागणी वाढेल आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल. त्यामुळे काशी सिंदूरी जातीची लागवड फायदेशीर ठरू शकते. इतर माहितीसाठी शेतकरी जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधू शकतात.