Corn Crop Management:- यावर्षी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेलाच परंतु कमी पावसाचा फटका हा रब्बी हंगामाला देखील बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी हंगामामध्ये उपलब्ध पाण्याचा विचार करून शेतकरी पिकांचे नियोजन करताना दिसून येत आहेत. रब्बी हंगामामध्ये शेतकरी प्रामुख्याने गहू आणि हरभरा व त्यासोबत मका या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात.
महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात मक्याचे लागवड क्षेत्र दिसून येते. खरीप हंगामाच्या तुलनेमध्ये रब्बी हंगामात मक्याची लागवड केली तर उत्पादन हे जवळजवळ दुप्पट असे मिळते. परंतु साहजिकच कुठल्याही पिकापासून जर आपल्याला भरघोस असे उत्पादन हवे असेल तर त्याचे व्यवस्थापन देखील त्या पद्धतीने होणे खूप गरजेचे असते.
मका पिकाच्या दृष्टिकोनातून रब्बी हंगामातील तापमान आणि वातावरण या पिकासाठी खूप अनुकूल असल्यामुळे जर चांगले व्यवस्थापन लागवडीपासून तर शेवटच्या टप्प्यापर्यंत ठेवले तर नक्कीच मका पीक चांगले उत्पादन शेतकऱ्यांना देऊ शकते. याच दृष्टिकोनातून या लेखात आपण मका पीक लागवड आणि इतर महत्त्वाच्या व्यवस्थापनाच्या बाबी समजून घेणार आहोत.
या गोष्टींची घ्या काळजी आणि मिळवा मक्याचे भरघोस उत्पादन
1- जमीन आणि लागवडीचा टाइमिंग– रब्बी हंगामात मका लागवड करायची असेल तर शिफारस केलेल्या कालावधी हा 15 ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर च्या दरम्यान आहे. परंतु जर काही दिवस किंवा एखादा आठवडा उशीर झाला तरी काही उत्पादनामध्ये खूप मोठा फरक पडत नाही. तसेच मका लागवडीसाठी उत्तम पाण्याचा निचरा होणारी, मध्यम ते भारी तसेच खोल व रेतीयुक्त आणि चांगली पाणी धारणक्षमता असलेली जमीन यासाठी आवश्यक असते व जमिनीचा सामु हा साडेसहा ते साडेसात दरम्यान असणे गरजेचे आहे.
2- रब्बीत कोणत्या वाणांची लागवड करावी?- रब्बी हंगामामध्ये मका लागवड करायची असेल तर प्रामुख्याने महाराजा, बायो 9681, बायो 9637, संगम तसेच कुबेर, राजश्री, फुले महर्षी, एचक्यूपीएम एक, पुसा संकरित मका एक, विवेक संकरित मका 21 व पुसा संकरित मका सत्तावीस हे संकरित व आफ्रिकन टॉल या प्रकारातील संमिश्र वाण लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेले आहेत.
3- लागवडी आधी बीज प्रक्रिया असते महत्त्वाचे– मका उत्पादनाकरिता मका लागवड करायची असेल तर पंधरा ते वीस किलो हेक्टरी आणि चाऱ्यासाठी मका लागवड करायची असेल तर 75 किलो बियाणे एका हेक्टरसाठी पुरेसे ठरते. लागवड करण्याअगोदर बियाण्याला दोन ते अडीच ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक व 25 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धक प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
4- लागवड किती अंतरावर करावी?- मध्यम व उशिरा कालावधीमध्ये तयार होणाऱ्या वानांची लागवड करायची असेल तर ती साधारणपणे 75 बाय वीस सेंटीमीटर अंतरावर करावी व लवकर काढणीस म्हणजेच पक्व होणाऱ्या वाणाची लागवड करायची असेल तर ती साधारणपणे 60 बाय 20 सेंटीमीटर अंतरावर टोकन पद्धतीने करावी.
5- खत व्यवस्थापन कसे करावे?- मका पिकासाठी खत व्यवस्थापन करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पेरणी किंवा लागवड करताना प्रतिहेक्टरी 88 किलो युरिया, 378 किलो सिंगल सुपर फॉस्फेट,68 किलो म्युरेट ऑफ पोटॅश खत देणे गरजेचे आहे. तसेच पेरणीनंतर किंवा लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांनी प्रत्येकी 88 किलो युरिया प्रति हेक्टर द्यावा. माती परीक्षण करून खतांचे नियोजन केले तर खूप फायद्याचे ठरते. जमिनीमध्ये जर झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तर पेरणीच्या वेळी हेक्टरी 20 ते 25 किलो झिंक सल्फेट देखील द्यावे.
अशाप्रकारे छोट्या छोट्या परंतु महत्वाच्या असलेल्या व्यवस्थापनाच्या या बाबी पूर्ण करून जर मका पिकाचे व्यवस्थापन केले तर नक्कीच भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होईल.