Cotton Crop Management :- महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात सर्वाधिक प्रमाणात लावले जाणारे हे पीक असून नगदी पिकात या कापूस पिकाची गणना होते. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील बऱ्याच राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित हे कपाशी या पिकावर अवलंबून आहे. त्यामुळे कपाशीचे भरघोस उत्पादन येणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून त्या पद्धतीने नियोजन देखील खूप महत्त्वाचे आहे.
जर आपण कपाशी पिकाचे नियोजनाचा विचार केला तर यामध्ये कीड व्यवस्थापनाला खूप मोठे महत्त्व आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारचे रस शोषक किडींचा प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणात या पिकावर झाला तर कपाशीच्या उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणावर घट संभवते. कपाशी पिकावर वेगवेगळ्या प्रकारच्या किड्यांचा प्रादुर्भाव होत असतो. यामध्ये प्रामुख्याने पांढरी माशी, तुडतुडे, फुलकिडे तसेच गुलाबी बोंडअळी सारख्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
यामध्ये फुलकिडी म्हणजेच आपण त्यांना थ्रिप्स असे देखील म्हणतो याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर सध्या दिसून येत आहे. फुलकिडींचा विचार केला तर हे पिकाच्या नुकसानीस खूप मोठ्या प्रमाणावर जबाबदार असतात. कपाशी पिकावर जर फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढला तर उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते. या अनुषंगाने आपण या लेखात कपाशी पिकावरील फुल किडे व त्यांची ओळख तसेच प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना बघणार आहोत.
फुलकिड्यांचे स्वरूप
फुलकिडे यांचा आकार पाहिला तर तो अतिशय सूक्ष्म असून एक मिमीपेक्षा देखील ते कमी लांब असतात व खूप नाजूक व लहान असतात. तिखट पिवळसर किंवा तपकिरी रंगाने असलेले हे किडे पानाच्या मागच्या बाजूला जास्त प्रमाणात दिसून येतात. फुलकिडीच्या पिल्लांचा विचार केला तर ते अतिशय सूक्ष्म असतात व त्यांना पंख नसतात. फुल किड्यांचे वेगवेगळे प्रकार असून यामध्ये आपण तैवान फुलकिड्यांचा विचार केला तर ही भारतामध्ये प्रामुख्याने दक्षिण भारतात गेल्या दोन वर्षापासून मिरची पिकावर दिसून येत आहेत.
फुल किड्याची ही प्रजात मिरचीच्या फुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. जर फुलकिडीचा जीवनक्रम पाहिला तर पूर्ण वाढ झालेली जी काही मादी असते ती पानाच्या पेशीमध्ये अंडी देते व पानाच्या मागच्या बाजूला राहते. एक मादी 30 ते 40 अंडी देते व या अंड्यांमधून दोन ते पाच दिवसांमध्ये पिले बाहेर येतात व ते पांढरे किंवा फिकट पिवळसर रंगाचे असतात.
चार ते सहा दिवसांची त्यांची पिलाअवस्था असते व शेवटची अवस्था पाहिली तर ती वीस तास जमिनीत कोषा अवस्थेप्रमाणे निश्चल राहते. त्यानंतर मात्र पिल्ले तीन वेळा कात टाकतात व पाच ते सहा दिवसांमध्ये प्रौढावस्थेत जातात. एक फुलकिड्याचा जीवन काल पाहिला तर तो दहा ते पंधरा दिवस इतका जगतो एका वर्षांमध्ये तीन ते चार पिढ्या त्याच्या पूर्ण होतात.
फुलकिड्यांमुळे कपाशी पिकाचे काय नुकसान होते?
फुलकिडे हे कापूस पिकाच्या पानामागे राहतात व त्या ठिकाणी खरवडतात व त्यातून रसाचे शोषण करतात. त्यामुळे कपाशीचे पाने, फुले आणि कळ्या आकसल्या जातात व झाडाची वाढ खुंटते. फुलकिड्यांचा जास्त प्रादुर्भाव झाला तर पाणी व झाड काळपट तसेच तपकिरी दिसते.
कोरडवाहू क्षेत्रामध्ये लागवड केली असेल तर ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसतो व साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात याचे प्रमाण वाढते. कपाशी पिकावर जर प्रत्येक पानावर दहा फुलकिडे दिसून आले तर समजावे ही आर्थिक नुकसान पातळी आहे.
फुलकड्यांचे व्यवस्थापन असे करावे
कपाशीची लागवड करताना जी काही शिफारस आहे त्याप्रमाणेच योग्य अंतरावर लागवड करणे गरजेचे आहे. जर पीक दाटले किंवा जास्त दाटी झाली तर याचा प्रादुर्भाव वाढतो. तसेच शिफारशी पेक्षा जास्त प्रमाणामध्ये जर नत्रयुक्त खतांचा आणि संप्रेरकांचा वापर केला तरी फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे जास्त वापर करू नये.
कोळपणी आणि खुरपणी वेळेवर करावी व त्या माध्यमातून तन नियंत्रणासाठी प्रयत्नशील असावे. आपण वर पाहिले की या किडीची शेवटची अवस्था जमिनीत निश्चल अवस्थेमध्ये राहते व अशा अवस्थेमध्ये जर कोळपणी आणि खुरपणी केली तर ही अवस्थेमध्ये कीड नष्ट होते. तसेच रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करताना त्यांच्यासोबत विद्राव्य खते तसेच संप्रेरके आणि महत्त्वाचे म्हणजे एका पेक्षा जास्त कीटकनाशके यांचे मिश्रण करू नये.
या रासायनिक फवारणी ठरू शकतात महत्त्वाच्या
रासायनिक पद्धतीने नियंत्रण करण्याकरिता फ्लोनीकॅमिड( 50 डब्ल्यू जी) तीन ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी
किंवा
फिफ्रॉनिल( पाच एससी) 30 मिली प्रति दहा लिटर पाणी
किंवा
डायनोटेफ्युरॉन( 20 एसजी) तीन ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी
किंवा
बुप्रोफेझिन( 25 एससी) 20 मिली प्रति दहा लिटर पाणी प्रमाणे फवारणी करू शकतात.
( पिकावर कुठल्याही प्रकारची फवारणी करताना कृषी कृषी तज्ञांचा सल्ला हा अतिशय आवश्यक आहे.)