Cotton Farming : पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, पाडळी, सुसरे, साकेगाव, चितळी, हत्राळ परिसरातून मोठया प्रमाणात कापूस विक्रीला येत असून, अनेक व्यापाऱ्यांनी आदिनाथनगर, तिसगाव येथे कापूस खरेदी सुरू केली आहे.
शेजारील गावांतील व्यापारी या ठिकाणी येऊन स्थानिक एजंटांमार्फत कापसाची खरेदी करीत असतात. आर्थिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांना कापसाची विक्री करावी लागत आहे.
हीच बाब हेरून अनेक व्यापारी खेड्यातही फिरू लागले आहेत; परंतू हे व्यापारी कापूस खरेदी करताना त्यांच्याकडे असलेल्या वजनकाट्यात तफावत असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांचा अनुभव पाहता खेड्यांमध्ये अनेक घटना अशा घडल्या आहेत की, वजनात पाप केल्यामुळे व्यापाऱ्याला बेदम मारहाण झालेली आहे. अनेक गावांत यापूर्वी व्यापारी कापसाचे वजन करताना गडबड घोटाळा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
असे असले तरीही व्यापाऱ्यांची खेड्यात येण्याची कमी नाही आणि त्यांना कापसाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचीही कमी नाही. कारण कापूस विक्रीसाठी बाजारात घेऊन जाणे शेतकऱ्यांना परवडत नाही.
आजकाल मजुरी भरमसाठ वाढल्यामुळे कापसाची काढणी करताना किलोमागे दहा ते पंधरा रुपये दर मजुरांना द्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत बाजारात कापूस न्यायचा म्हटलं तर खर्च वाढतो.
त्यामुळे गावात आलेल्या व्यापाऱ्यांना कापूस देणे शेतकरी पसंत करतो; शेतकरी व्यापाऱ्याकडील वजनकाट्याची पडताळणी करत नाही. आणि पडताळणी जरी केली तरी व्यापाऱ्यांचे दलाल तसेच मापाडी एवढे हुशार असतात की, ते कुठल्यातरी मार्गाने त्या ठिकाणी वजनात मारल्याशिवाय राहत नाहीत,
त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जिल्हा वजनमाप विभागामार्फत या ठिकाणी वजनकाटांची वेळोवेळी तपासणी होणे गरजेचे आहे तसेच परिसरात तात्पुरत्या स्वरूपात एखादे कार्यालय सुरू करणे गरजेचे आहे.
त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे कापूसउत्पादक शेतकऱ्यांचे मत आहे.