Onion Cultivation : सध्या रब्बी हंगामाची तयारी सुरू असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये रब्बी हंगामात गहू, हरभरा, मका तसेच रब्बी ज्वारी आणि कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
कांद्याच्या दृष्टिकोनातून नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक जास्त लागवड कांद्याची होते व त्या खालोखाल सोलापूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर लागवड होते.
तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात आता कांद्याच्या लागवड क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्रमध्ये तीन हंगामात कांद्याची लागवड केली जाते व ते तीन हंगाम म्हणजे खरीप, रांगडा आणि रब्बी हे होय.
ज्याप्रमाणे कुठल्याही पिकाच्या भरघोस उत्पादनाकरिता व्यवस्थापन अचूक होणे खूप गरजेचे असते व त्याच पद्धतीने कांद्याच्या भरघोस उत्पादनाकरिता कांद्याचे शेत तयार करण्यापासून तर सुधारित जातींची निवड व खत व्यवस्थापना सारख्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. याच अनुषंगाने जर आपल्याला रांगडा कांद्याचे भरघोस उत्पादन हवे असेल तर नेमके कशा पद्धतीने नियोजन आणि कोणत्या जातींची निवड करावी? इत्यादी बद्दल
महत्त्वाची माहिती घेऊ.
या आहेत कांद्याच्या सुधारित जाती
कुठल्याही पिकाच्या भरघोस उत्पादनामध्ये दर्जेदार आणि सुधारित जातींची निवड खूप महत्त्वपूर्ण ठरते. अगदी याच पद्धतीने रांगडा हंगामामध्ये जर कांद्याची लागवड करायची आहे तर त्याकरिता तुम्ही बसवंत 780 आणि फुले समर्थ यासारख्या साठवणुकीला उत्तम असलेल्या जातींची निवड करू शकतात. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले समर्थ व बसवंत 780 आणि एन-2-4-1 या जाती या हंगामा करिता लागवडीसाठी विकसित केलेले आहेत.
कांदा बियाण्याची निवड करताना ही काळजी घ्यावी
जर कांद्याच्या दर्जेदार बियाण्याच्या बाबतीत विचार केला तर बिजोत्पादन करताना कांदा साठवणुकीमध्ये चांगल्या प्रकारे टिकलेला कांदा गोटापासून दीड किलोमीटर सुरक्षित असे विलगीकरण अंतर ठेवून बीजोत्पादन केले तरच त्या जातींमधील साठवणूक क्षमता बियाण्यामध्ये टिकून राहते. अशा पद्धतीने साठवलेल्या कांदा गोटापासून तयार केलेले खात्रीलायक व उत्तम दर्जाच्या बियाण्याची लागवडीसाठी निवड करणे गरजेचे आहे.
जमिनीची पूर्व मशागत कशी करावी व रोपवाटिका कशी तयार करावी?
रांगडा हंगामामध्ये जर कांद्याची लागवड करायची असेल तर त्याकरिता साधारणपणे तुम्हाला ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत कांद्याचे रोपवाटिका तयार करणे गरजेचे आहे. त्यानंतर रोपांची पुनर लागवड तुम्ही सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात करू शकतात.
कांदा लागवडीकरिता एक सारखी रोपे असणे खूप गरजेचे आहे. कारण जर तुम्ही लागवडीला एकसारख्या रोपांची निवड केली तर कांद्याचे उत्पादन देखील एकसारखेच मिळते व साठवणुकीसाठी हा कांदा खूप चांगला असतो.
एक सारख्या रोपांच्या निर्मिती करिता तुम्हाला रोपवाटिकेत तीन बाय दोन मीटर आकाराचा गादीवाफा तयार करावा व प्रति गादी वाफ्यात दोन घमेले शेणखत, 250 ग्रॅम 15:15:15,20 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईडची पावडर मिसळणे गरजेचे आहे.
तसेच बियाणे टाकताना किंवा बियाणे पेरताना प्रत्येक वाफ्यामध्ये दहा सेंटिमीटर अंतराच्या ओळीमध्ये पातळ पेरावे. बियाण्याची उगवण झाल्यानंतर साधारणपणे पंधरा दिवसांनी दोन ओळींमध्ये व्यवस्थित हलकीशी खुरपणी करून घ्यावी व प्रत्येक वाफ्याला 50 ग्रॅम युरिया व पाच ग्रॅम थिमेट द्यावे.
त्यानंतर एक महिन्याने दहा लिटर पाण्यात दहा मिली रोगर+ 25 ग्रॅम डायथेन एम 45+ दहा मिली चिकटद्रव्य म्हणजेच स्टिकर मिसळून एक फवारणी द्यावी. अशा पद्धतीने सहा ते सात आठवड्यामध्ये एकसारख्या आकाराची दर्जेदार रोपे तयार होतात व ही रोपे लागवडीकरता वापरावी.
अशा पद्धतीने करावे खताचे व्यवस्थापन
कांदा पिकाच्या भरघोस उत्पादनाकरिता कांदा पिकाचे खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. भरखत म्हणून हेक्टरी 20 टन शेणखत मशागतीच्या वेळी वापरावे व वरखते म्हणून हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश द्यावे.
या डोस पैकी अर्धे नत्र व संपूर्ण पालाश व स्फुरद लागवडीपूर्वी वाफ्यात मिसळून द्यावे व उरलेले 50 किलो नत्र कांदा लागवडीनंतर तीस दिवसांनी द्यावे. खत व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कांद्याच्या लागवड झाल्यानंतर 60 दिवसांनी कुठल्याही प्रकारची रासायनिक खतांची मात्रा पिकाला देऊ नये.
जर नत्राची मात्रा जर जास्त किंवा उशिरा दिली तर जोड आणि डेंगळे कांदे येण्याचे प्रमाण वाढते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे जमीन भुसभुशीत राहावी व कांदा चांगला टिकावा याकरिता अमोनियम सल्फेट आणि सल्फेट ऑफ पोटॅश या गंधक युक्त खतांचा वापर करावा.
लागवड करताना या बाबींकडे लक्ष द्या
कांद्याची लागवड सपाट वाफा किंवा सरी वरंबा पद्धतीने करणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे कोरड्या वाफ्यामध्ये लसणासारखे कांदा रोपांची लागवड केली तर वाफ्यामधील रोपांची संख्या आपल्याला योग्य प्रमाणात ठेवता येते व लागवड दाट होऊन मध्यम आकाराचा एकसारखा कांदा आपल्याला मिळतो.
या आकाराचे कांदे हे साठवणुकीसाठी देखील चांगले असतात. ओळीचे अंतर पाहिले तर उन्हाळी किंवा रब्बी हंगामा करिता दोन ओळींमध्ये पंधरा बाय दहा व दोन रोपातील अंतर तीन इंच ठेवल्यास 25 ते 30 टन उत्पादन मिळते. कोरड्या वाफ्यात लागवड केल्यावर वाफ्यामध्ये पाणी हळुवार सोडावे व रोपाच्या विरुद्ध दिशेने पाणी द्यावे. आंबवणीला जेव्हा तुम्ही पाणी द्याल तेव्हा जर खाडे पडले असतील तर ते खाडे भरून घ्यावेत.
कांदा पिक तणविरहित ठेवण्यासाठी रासायनिक तणनाशकांचा वापर
कांदा पीक तणविरहित ठेवणे खूप गरजेचे आहे. याकरिता लागवडीनंतर सुरुवातीच्या कालावधीत शेतामध्ये तण होऊ नये यासाठी लागवड केल्यानंतर 21 दिवसांनी ऑक्सिफ्लोरोफेन 23.5 टक्के ईसी, क्युझेलफॉफ इथाईल पाच टक्के ई.सी दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अशा पद्धतीने जर कांदा पिकाचे नियोजन केले तर नक्कीच भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होईल.