Agriculture News : राहाता तालुक्यातील फळबांगाचा पीक विमा तसेच खरीप पीक विम्याची उर्वरीत रक्कम रखडली आहे. विमा कंपन्यांनी पात्र शेतकऱ्यांना तातडीने विम्याची रक्कम द्यावी, अशी मागणी राहाता तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र निर्मळ यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेत चालू वर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विमा हिस्सा भरण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे गेल्या खरीपात हवामान आधारीत फळबाग पीक विमा योजनेअंतर्गत राहाता तालुक्यात दिड हजार व बाभळेश्वर मंडळात जवळपास साडेचारशे शेतकऱ्यांनी तर खरीपासाठी तालुक्यात ४६ हजार तर बाभळेश्वर मंडळात ७ हजार ५०० शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला होता.
पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांमध्ये २१ दिवसांपेक्षा जास्त दिवसाचा पावसाचा खंड पडला होता. विमा योजनेच्या नियमानुसार असा खंड पडल्यास २५ टक्के रक्कम आगाऊ देण्याची तरतूद केली आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे या २५ टक्के आगाऊ रकमेचे वाटप विमा कंपनीने केली आहे. २५ टक्के रक्कम आगाऊ मिळाल्यानंतर राज्य सरकारने या भागात दुष्काळ व टंचाई जाहीर केली आहे.
त्यामुळेने उर्वरीत पीक विम्याची रक्कम जानेवारी अखेर मिळणे अपेक्षीत होते. सध्या मार्च महीना उजाडला आहे. अद्याप या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेल्या नाहीत. तसेच डिसेबर महिन्यात हवामान आधारीत फळ पिकविमा योजनेचा कालखंड संपला आहे, कमी पाऊस व इतर ट्रीगरमध्ये बसल्याने सर्वच फळबाग धारक शेतकरी पिक विम्याच्या परताव्यास पात्र झालेले आहेत; मात्र अद्यापही हे परतावे मिळालेले नाहीत.
कमी पाऊस, नापिकी व दुष्काळ या सर्व बांबीमुळे शेतकरी वर्ग पिचलेला आहे. पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना यावेळी परतावे देण्यात टाळाटाळ करत आहेत. शासनाने यामध्ये लक्ष घालुन विमा कंपन्याना उर्वरीत परतावे देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी राहाता तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र निर्मळ यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
दुष्काळ जाहीर मग मदत कधी?
राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्यातच तालुक्यासह जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे; मात्र दुष्काळ जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना रोखीने द्यावयाची दुष्काळी मदत अद्याप जाहीर केलेली नाही. दुष्काळाने शेतकरी प्रंचड अडचणीत असल्याने शासनाने तातडीने पिकविम्याच्या रकमेसह ही मदत द्यावी. – राजेंद्र निर्मळ, राहाता तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस