Maize Crop Variety:- खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये महाराष्ट्रात मक्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. मक्याचा जर आपण वापर पाहिला तर तो प्रामुख्याने पशु आणि पोल्ट्री खाद्य निर्मिती करणाऱ्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो.
तसेच आता इथेनॉल निर्मितीकरिता देखील मक्याचा वापर केला जात असल्यामुळे मक्याला येणाऱ्या कालावधीत देखील चांगलेच दर मिळतील अशी एक शक्यता आहे. सध्या देखील मक्याला चांगले दर मिळत असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत असून त्यामुळे येणाऱ्या कालावधीत मक्याच्या लागवड क्षेत्रात नक्कीच वाढ होईल अशी एक शक्यता आहे.
परंतु यामध्ये कुठल्याही पिकापासून जर आपल्याला चांगले उत्पादन हवे असेल तर लागवडीसाठी आपण जो काही वाण निवडणार तो दर्जेदार आणि भरघोस उत्पादन देणारा असणे गरजेचे आहे. नाहीतर आपण किती जरी व्यवस्थापन केले आणि लागवडीसाठी निवडलेला वाण उत्तम दर्जाचा नसेल तर मात्र काहीही फायदा होत नाही. अगदी याच प्रकारे तुम्हाला देखील मका लागवड करायची असेल तर या लेखात दिलेले काही वाण फायद्याचे ठरू शकतात.
ही आहेत मक्याची भरघोस उत्पादन देऊ शकणारी वाण
1- ह्यूनिस- मक्याचा हा संकरित वाण लागवडीकरिता उपयुक्त असून याच्या दाण्यांचा रंग पिवळा असतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मक्याचा हा वाण खोडकीड व तांबेरा रोगाला मध्यम प्रतिकारक असून खरीप व रब्बी हंगामात लागवडीस व आंतरपीक म्हणून देखील योग्य असा वाण आहे. या वाणाच्या लागवडीपासून सरासरी हेक्टरी 45 ते 50 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
2- पंचगंगा (संयुक्त वाण)- मक्याच्या या जातीचा दाण्याचा रंग पांढरा असतो व कमी कालावधीत काढणीस तयार होणारा वाण असून पानावर येणाऱ्या करपा रोगाला प्रतिकारक्षम आणि आंतरपीक म्हणून देखील लागवडिस योग्य असा वाण आहे. मिळणाऱ्या उत्पादनाचा विचार केला तर हेक्टरी 45 ते 48 क्विंटल सरासरी उत्पादन मिळते.
3- करवीर( संयुक्त वाण)- या वाणाच्या दाण्याचा रंग नारंगी असतो व आकाराने टपोरी दाणा असतो. कीड व विविध रोगांना प्रतिकारक्ष असा वाण असून खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामासाठी लागवडीस उत्तम वाण आहे. करवीर वाणापासून हेक्टरी 52 ते 55 क्विंटल खरिपात आणि रब्बी हंगामात 65 ते 68 क्विंटल हेक्टरी इतके उत्पादन मिळते.
4- राजश्री- मक्याचा हा वाण देखील एक महत्त्वाचा संकरित वाण असून याचा दाण्याचा रंग नारंगी व आकाराने मध्यम चपटा दाणा असतो. मध्यम कालावधीत परिपक्व होणारा व पानांवरील करपा रोगाला तसेच खोडकीळ व सोंड्या भुंगा यासारख्या कीटकांना प्रतिकारक्षम असा वाण आहे.खरीप व रब्बी हंगामात लागवडीकरिता उत्तम वाण असून सरासरी उत्पादन हेक्टरी 45 ते 48 क्विंटल पर्यंत मिळते.
5- फुले महर्षी( संकरित वाण)- या वाणाचा मक्याच्या दानाचा रंग नारंगी तसेच आकाराने मध्यम चपटा असा दाना असतो व मध्यम कालावधीत म्हणजेच लागवडीनंतर 90 ते 100 दिवसात काढणीस तयार होतो. खोडकूज तसेच इतर रोग व खोडकिडीस प्रतिकारक्षम असा वाण असून ट्रसीकम पर्ण करपा,
पट्टेरी पर्ण व खोडकूज आणि काळी खोडकुज इत्यादी रोगास मध्यम प्रतिकारक्षम वाण असून पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असलेला वाण आहे. तसेच हा जमिनीवर लोळत नाही म्हणजे जमिनीवर आडवा पडत नाही.या वाणाची खरीपात लागवड केली तर हेक्टरी 75 ते 80 क्विंटल आणि रब्बी हंगामात लागवड केली तर 85 ते 90 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.