Agricultural News : जामखेड तालुक्यात अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची पिळवणूक व जाणीवपूर्वक अडवणूक होत आहे. कृषी, महसुल, महावितरण, व आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत.
दुधाला भाव व कांदा निर्यात उठवली पाहिजे, आधिकाऱ्यांनो शेतकऱ्यांचे रक्त पिण्याचे काम बंद करा अन्यथा जामखेड तालुक्यात पुढील आंदोलन आनखी तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख मंगेश आजबे यांनी रास्तारोको आंदोलना दरम्यान दिला,
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच शासनाला शेतकऱ्यांचा आक्रोश दिसावा यासाठी दि. २७ डिसेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शहरातील खर्डा चौकात आक्रोश मोर्चा व रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, भिमराव पाटील, काकासाहेब चव्हाण, गणेश हगवणे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष नय्युम शेख, मा. सरपंच कृष्णा चव्हाण, बापुसाहेब शिंदे, मा. सरपंच निलेश पवार, सरपंच दत्तात्रय साळुंके, चेअरमन विलास जगदाळे यांच्या सह तालुक्यातील विविध गावातील शेतकरी उपस्थित होते.
पुढे बोलताना आजबे म्हणाले की, बाजार समितीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात यावा. मार्केट कमिटीच्या बाहेर आडती चालतात त्यांना बाजार समितीमध्ये जागा देण्यात यावी.
कृषी विभागाकडुन शेततळे होत नाहीत. गावातील ग्रामपंचायत मध्ये संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांच्या ग्रामपंचायत बोर्डवर नाव व मोबाईल नंबर टाकावा. ठीबक सिंचन कांदाचाळ आनुदान चालु करावे. पशुवैद्यकीय अधिकारी यांचे औषधे व शासकीय गुरांच्या डॉक्टरांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाहीत.
शेतकरी सध्या मेटाकुटीला आला आहे, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद केली आहे ती उठवण्यात यावी, दुधाचे भाव उतरले व दुध भेसळ वाढली आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळत नाही, तालुक्यातील महावितरण कंपनीच्या खाजगी ठेकेदाराकडुन होणारी शेतकऱ्यांची लुट थांबली पाहिजे.
यानंतर विविध आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, जामखेड नगरपरिषद हद्दीतील वाड्या वस्त्यावरील शेतकरी शासनाच्या विविध योजनातून वगळले आहेत. त्यामुळे त्यांना कृषी व पंचायत समितीच्या योजना मिळत नाहीत या योजना त्यांना त्वरीत लागु कराव्यात अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे, शेतकऱ्यांचे वाटोळे विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाने केले आहे. शेतकरी मजुराला सुध्दा विमा योजनेत घेतले पाहिजे.
संघटनेच्यावतीने नायब तहसीलदार मनोज भोसेकर व कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, पोलीस निरीक्षक महेश पाटील, बाजार समितीचे अशोक यादव व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन रास्तारोको आंदोलनात मागे घेण्यात आले. या वेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता,
तालुक्यातील कृषी विभागाचे खर्डा, नान्नज, जामखेड असे तिन मंडळ अधिकारी कार्यालय होते. परंतु अधिकाऱ्यांच्या सोयीनुसार आणि शेतकऱ्यांच्या अडवणूकीसाठी सर्व ऑफिस हे जामखेड या ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. हे सर्व कार्यालये त्या त्या ठिकाणी सुरू करण्यात यावेत अन्यथा पुन्हा शेतकऱ्यांच्यावतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.