कृषी

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ‘हे’ वाण लागवडीसाठी वापरा आणि मका, लसणाचे भरघोस उत्पादन मिळवा! जाणून घ्या माहिती

Garlic and Corn Crop Variety:- कृषी क्षेत्राच्या विकासासाठी किंवा कृषी क्षेत्रामधून विविध पिकांचे भरघोस उत्पादनासाठी ज्याप्रमाणे सर्व प्रकारचे योग्य व्यवस्थापन योग्य कालावधीत करणे गरजेचे असते.अगदी त्याचप्रमाणे पिकांच्या लागवडीकरिता कोणत्या व्हरायटींची म्हणजेच वाणांची निवड करत आहात याला देखील खूप महत्त्व असते.

कुठल्याही पिकाचे वाण लागवडीसाठी निवडताना दर्जेदार स्वरूपाचे असेल तर नक्कीच त्या माध्यमातून मिळणारे उत्पादन देखील भरघोस असे मिळते. परंतु बियाणे जर सदोष निघाले तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो व पूर्ण हंगाम वाया जातो.

याकरिता पिक लागवडीपूर्वी योग्य वानांची निवड ही खूप महत्त्वाची ठरते. देशामध्ये अनेक पिकांच्या वेगवेगळ्या दर्जेदार अशा वाणांच्या विषयी संशोधन आणि वाण विकसित करण्यामध्ये विविध कृषी विद्यापीठांची खूप मोलाची भूमिका आहे.

अगदी याच पद्धतीने महाराष्ट्रातील अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ देखील या कामांमध्ये अग्रगण्य असून या ठिकाणी अनेक पिकांच्या सुधारित वानांवर संशोधन सध्या सुरू आहे. या विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना भरपूर उत्पादन देऊ शकतील अशी विविध पिकांची वाणे उपलब्ध करून दिली जातात.

याचप्रमाणे यावर्षी या विद्यापीठाने मक्याचे पीडीकेव्ही आरंभ( बीएमएच 18-2) आणि लसणाचे पीडीकेव्ही पूर्णा( एकेजी 07) हे वाण विकसित केलेले आहेत.

कृषी विद्यापीठे संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या सभेमध्ये हे वाण प्रसारित करण्यात आले. उत्पादनाच्या बाबतीत हे दोन्ही वाण उत्तम असून भरघोस उत्पादनासाठी नक्की शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरतील असा दावा विद्यापीठाने केला आहे.

 डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि विकसित केलेले वाण

1- मक्याचे पीडीकेव्ही आरंभ(बीएमएच 18-2) वाण मक्याच्या या वाणाची शिफारस महाराष्ट्रात खरीप व कोरडवाहूसाठी करण्यात आली असून या वाणापासून कडब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर मिळते.

लागवडीनंतर साधारणपणे 95 ते 100 दिवसात हे वाण परिपक्व व काढणीस तयार होते व पानावरील करपा रोगास मध्यम प्रतिकारक असून हेक्टरी 101 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये हे वाण विशेष पसंतीस असल्याचे दिसून येत आहे.

2- लसणाचे पीडीकेव्ही पूर्णा( एकेजी 07) वाण डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने लसणाचे पीडीकेव्ही पूर्णा हे अधिक उत्पादन देणारे वाण मागच्या वर्षीच्या हंगामामध्ये विकसित केले असून या लसूण वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते जास्त उत्पादन देणारे वाण म्हणून ओळखले जाते.

पांढऱ्या शुभ्र रंगाचे जास्त विद्राव्य घनपदार्थाचे प्रमाण असणारे गाठे आणि जास्त कालावधीपर्यंत साठवणूक करता येईल व कमीत कमी नुकसान होईल असा हा वाण आहे.

रब्बी हंगामा करिता महाराष्ट्रातील जमिनीसाठी हा वाण शिफारस करण्यात आला असून यापासून मिळणारे हेक्टरी उत्पादन पाहिले तर ते 119 क्विंटल पर्यंत आहे. लागवडीपासून साधारणपणे 130 ते 135 दिवसात काढणीस तयार होते.

पांढरे शुभ्र रंगाचे व सरासरी 21 ग्रॅम वजनाचे गाठे या वाणाचे असतात. याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे करपा रोगास प्रतिकारक असून फुलकिडीस मध्यम प्रतिकारक आहे. त्यामुळे रोगराई नियंत्रणासाठी करावा लागणारा खर्च देखील कमीत कमी होतो व पैशांमध्ये बचत होते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts