कृषी

आंबा,नारळाच्या पट्ट्यात 35 गुंठ्यात केली ड्रॅगन फ्रुटची लागवड! वर्षाला घेतो 6 ते 7 लाखाचे उत्पन्न; जाणून घ्या शेतकऱ्याची यशोगाथा

Dragon Fruit Farming:- कोकण म्हटले म्हणजे आपल्याला सगळीकडे नारळ, आंबे तसेच पोफळी व फणसाच्या बागा दिसून येतात. तसेच या ठिकाणाचे अनेक तरुण नोकरीसाठी मुंबईत असतात. परंतु या आंबा आणि फणसाच्या पट्ट्यामध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड करणे व ती यशस्वी करून दाखवणे हे जरा कठीण काम.

परंतु पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ या गावचे रहिवासी असलेले अमर कदम यांनी मात्र ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. ज्या मातीला फणस आणि नारळ तसेच आंब्याची सवय आहे अशा मातीत या तरुणाने कष्टाने ड्रॅगन फ्रुटची सवय लावली व ड्रॅगन फ्रुटचे भरघोस असे उत्पादन मिळवण्यामध्ये यश मिळवले आहे.

कोकणात फुलवला ड्रॅगन फ्रुटचा मळा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रायगड जिल्ह्यामध्ये पोलादपूर तालुका असून या तालुक्यातील नाणेघोळ येथील रहिवासी असलेले अमर कदम हे मुंबईमध्ये नोकरीला होते.

परंतु गेल्या तीन वर्षांपूर्वी त्यांनी या ठिकाणाची नोकरी सोडली व सरळ गावी येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीमध्ये त्यांनी अनेक प्रयोग करायला सुरुवात केली व याच प्रयोगाचा भाग म्हणून ड्रॅगन फ्रुटची लागवड केली.

आंबा आणि फणस तसेच नारळाच्या पट्ट्यामध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड हा नवीनच प्रयोग होता व तो त्यांनी यशस्वी करून दाखवला. सुरुवातीला त्यांनी शेतीमध्ये अननस तसेच कलिंगड व झेंडूच्या फुलांचे देखील चांगले उत्पादन घेतले.

परंतु शेतीमध्ये जर तुम्हाला कमी जागेत जास्त उत्पन्न हवे असेल तर ड्रॅगन फ्रुटची लागवड फायद्याची ठरू शकते हे त्यांना कळले व त्यांनी ड्रॅगन फ्रुटची लागवड केली व ती शेती यशस्वी केली. अवघ्या 35 गुंठा मध्ये ते 6 ते 7 लाख रुपयांचे उत्पन्न या माध्यमातून मिळवत आहे.

अशा पद्धतीने केली ड्रॅगन फ्रुटची शेती
जेव्हा त्यांनी ड्रॅगन फ्रुटची शेती करायचा निर्णय घेतला तेव्हा ड्रॅगन फ्रुटच्या वेलींना आधार म्हणून आवश्यक असलेले साडेतीनशे पोल उभे केले व आज त्यांचे हे पोल बाराशे पर्यंत गेले आहेत.

सुरुवातीला दोन वर्ष खूप मेहनत त्यांना घ्यावी लागली. बऱ्याच प्रकारच्या अडचणी देखील सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांना आल्या. परंतु त्यानंतर देखील त्यांनी अतिशय कष्ट घेऊन आणि व्यवस्थित नियोजन करून ड्रॅगन फ्रुटचे यशस्वीपणे उत्पादन घेतले.

अमर कदम यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की जर शेतीमध्ये तुमची मेहनत घ्यायची तयारी असेल आणि यामध्ये आवश्यक असलेले तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन जर तुम्ही ठेवले तर क्षेत्रामध्ये देखील तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात हे यातून सिद्ध होते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts