कृषी क्षेत्राचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावर या क्षेत्राचा विकास झाला असून याकरिता आधुनिक तंत्रज्ञान आणि शेती विषयी बदललेल्या दृष्टिकोन या गोष्टी कारणीभूत आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कृषी क्षेत्राचा विकास झाला आहे हे म्हणत असताना आपण थेट शेतीची पूर्व मशागतीपासून ते पीक काढणी पर्यंतचा जो काही कालावधी असतो यामध्ये सर्व बाबी या आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने करण्यात येत आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि भरघोस उत्पादन मिळणे शक्य झाले परंतु जर आपण भरघोस उत्पादनाचा विचार केला तर पिकांच्या दर्जेदार आणि उत्पादनक्षम वानांचा विकास हा देखील महत्वपूर्ण आहे. देशातील कृषी विद्यापीठे तसेच कृषी संशोधन संस्था तसेच कृषी विज्ञान केंद्र यांचा खूप मोलाचा सहभाग यामध्ये आहे. भारतीय कृषी संशोधन संस्था देखील शेती क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते.
पिकांच्या भरपूर उत्पादनामध्ये दर्जेदार वाणाची भूमिका देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण बटाटा पिकाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बटाट्याची लागवड बऱ्याच ठिकाणी केली जाते. परंतु बटाट्यामध्ये देखील जो काही आपण सामान्य बटाटा पाहतो त्यापेक्षा गुलाबी अर्थात पिंक बटाट्याची लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरू शकते. हा बटाटा खायला सामान्य बटाट्यापेक्षा खूप उत्तम असा लागतो.
तज्ञांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा बटाटा जास्त प्रमाणात पौष्टिक असल्याचे मानले जाते. त्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि स्टार्चचे प्रमाण चांगले असते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून गुलाबी बटाटा खूप फायदेशीर असल्याचे मानले जाते. तसेच या बटाट्याची साठवणूक क्षमता देखील चांगली असते कारण तो लवकर सडत नाही. सध्या खूप वेगाने गुलाबी बटाटा मार्केट काबीज करत असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील याचा फायदा मिळू लागला आहे.
शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कसा आहे गुलाबी बटाटा फायद्याचा?
तुम्हाला जर गुलाबी बटाट्याची लागवड करायची असेल तर तुम्ही डोंगराळ आणि सपाट अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये करू शकतात. साधारणपणे 80 ते 100 दिवसात परिपक्व होणारे हे पीक असून या बटाट्यावरची चमक या बटाट्याला मागणी जास्त असण्याला कारणीभूत आहे. बाजारपेठेतील दर हे सामान्य बटाट्या पेक्षा जास्त आहेत. येणाऱ्या उत्पादनाचा विचार केला तर एका हेक्टरमध्ये 400 क्विंटल पेक्षा अधिक उत्पादन गुलाबी बटाट्याचे मिळू शकते.
चांगला दर मिळाला तर एका पिकातून शेतकऱ्याला एक ते दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणे शक्य आहे. तसेच मागणी चांगले असण्यामागील कारणांचा विचार केला तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा बटाटा खूप महत्त्वपूर्ण आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरिता सामान्य बटाट्याच्या तुलनेमध्ये गुलाबी बटाटा खूप महत्त्वाचा असल्याचे तज्ञ म्हणतात.
तसेच साठवण क्षमता देखील चांगली आहे व गुलाबी बटाट्याचे सेवन केल्यामुळे जे काही विषाणूमुळे आजार होतात ते देखील होत नाहीत. तसेच उत्पादन खर्च कमी असल्यामुळे नफा देखील जास्त मिळतो. अशाप्रकारे आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील गुलाबी बटाटा महत्त्वपूर्ण असल्यामुळे याला मागणी चांगली असते व मागणी चांगली असल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना गुलाबी बटाटा लागवडीतून चांगला नफा मिळवता येणे शक्य आहे.