Farmer Success Story:- शेती क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान आल्याने आता कोणत्याही जमिनीत येणारे पीक आता कुठेही घेता येणे शक्य झाले आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर सफरचंद आपल्याला माहित आहे. साधारणपणे उत्तर भारतामध्ये म्हणजेच हिमाचल प्रदेश सारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकणारे आणि थंड हवामानातच तग धरू शकणारे सफरचंद हे महत्त्वाचे पीक असून ते आता महाराष्ट्र सारख्या उष्ण प्रदेशात देखील शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवले आहे.
त्यातल्या त्यात अनेक तरुण शेतकरी आता शेतीमध्ये आल्यामुळे ते अनेक वेगवेगळे प्रयोग करतात व तंत्रज्ञानाचा अवलंब करून ते प्रयोग यशस्वीरित्या सत्यात देखील उतरवतात. आता केळी पिकाचा विचार केला तर प्रामुख्याने केळी पिकासाठी जळगाव जिल्हा ओळखला जातो व केळी पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी काळीची रेगूर मृदा योग्य मानली जाते.
परंतु याही पुढे जात बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील आरणवाडी या डोंगराळ भागांमध्ये सुनील शिनगारे या तरुण शेतकऱ्याने केळीचे पीक यशस्वी करून दाखवले आहे. या यशामागे नवीन तंत्रज्ञानाची जोड तसेच मेहनतीचे सूत्र तर कामी आलेच.परंतु वेळोवेळी कृषी तज्ञांचे बहुमोल मार्गदर्शन देखील त्यांना फायद्याचे ठरले.
22 लाखापर्यंत उत्पन्न मिळण्याची आहे अपेक्षा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दुष्काळग्रस्त म्हणून समजल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात अरणवाडी सारख्या डोंगराळ गावामध्ये किंवा भागांमध्ये शेती करणाऱ्या सुनील शिनगारे या तरुण शेतकऱ्याने केळी लागवड करण्याचे ठरवले व कृषी तज्ञांचे योग्य मार्गदर्शन घेऊन व त्याला तंत्रज्ञानाची जोड देत मागील दोन वर्षापासून त्यांनी शेतकऱ्यांसमोर एक वेगळाच प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.
सुनील हे कायम प्रयोगशील असल्यामुळे ते कृषी विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची मदत व मार्गदर्शन घेत डोंगराळ भागातील त्यांच्या शेतामध्ये दोन वर्षापासून अनेक पिकांचे नवनवीन प्रयोग करत आहेत. केळी सोबतच त्यांनी या अगोदर फुलकोबी आणि मिरचीचे देखील डोंगराळ भागांमध्ये यशस्वी उत्पादन घेतले आहे.
त्यांनी अगोदर तीन एकर क्षेत्रामध्ये हिरवी मिरचीची लागवड केली व तब्बल 123 मॅट्रिक टन इतके उत्पादन घेतले. इतकेच नाही तर फुलकोबीतून देखील त्यांना चांगला नफा मिळाला होता. त्यानंतर ते केळी पिकाकडे वळले व जवळपास तीन एकर क्षेत्रामध्ये केळीची 3500 रोपे आणली व सात बाय पाच सेंटिमीटर अंतरावर त्यांची लागवड केली. विशेष म्हणजे त्यांनी केळी लागवडी करिता जैन टिशू कल्चर रोपांची निवड केली.
जमिनीची योग्य मशागत करून त्यामध्ये शेणखत व रासायनिक खत टाकून रोप लावण्यासाठी बेड तयार केले. केळीची लागवड केल्यानंतर साधारणपणे पंधरा दिवसांच्या अंतराने खतांच्या देखील योग्य प्रमाणे आळवण्या केल्या व करपा रोगाचे लक्षणे दिसायला लागताच त्यावर कॉपर ऑक्सीसाइड आणि स्ट्रेप्टोसायकलीन यासारखे बुरशीनाशक फवारून संपूर्ण प्रकारे व्यवस्थापन केले.
सध्या त्यांच्या शेतामध्ये सहा महिन्याचे केळी पीक असून त्याची वाढ देखील दमदार झाल्याची स्थिती आहे. उत्पादन मिळण्यासाठी अजून सहा महिन्याच्या कालावधी बाकी असून जर निसर्गाने साथ दिली तर त्यांना 180 मेट्रिक टन केळीचे उत्पादन मिळेल असा अंदाज आहे.
आजपर्यंत सुनील यांनी तीन एकर केळीसाठी तीन लाख रुपये खर्च केला आहे. परंतु जर बाजारभाव योग्य मिळाला तर 22 लाख रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे.