Farmer Success Story : खानदेश पराक्रमाची भूमी म्हणून ओळखली जाते. या प्रांतातील लोक सर्वच क्षत्रात अग्रेसर आहेत. शेतीमध्ये देखील खानदेशने आपला एक वेगळा ठसा संपूर्ण महाराष्ट्रवर्षात उमटवला आहे.
शेतीमध्ये देखील खानदेश प्रांतातील शेतकरी आपल्या नेत्र दीपक कामगिरीमुळे सर्व महाराष्ट्राचे आपल्याकडे कायमच लक्ष वेधत असतात. आज आपण खानदेशरत्न जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या अशा एका प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने जळगाव सारख्या जिल्ह्यात ड्रॅगन फ्रुटची शेती यशस्वी करून दाखवली आहे.
यामुळे सध्या या खानदेशी शेतकऱ्याचा हा प्रयोग सर्वत्र चर्चिला जात आहे. तालुक्यातील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर हायवेवरील गलंगी येथील युवा शेतकरी सुखदेव कोळी याने ड्रॅगनफ्रुट लागवडीचा हा प्रयोग यशस्वी केला आहे. विशेष म्हणजे या संदर्भात त्यांनी युट्युबवर माहिती घेतली आहे.
सुखदेव यांनी युट्युबवर सांगोल्यातील भामणे गावातील ड्रॅगनफ्रुट संदर्भातील एक माहितीचा व्हिडिओ पाहिला होता. व्हिडिओ बघितल्यानंतर ड्रॅगन फ्रुट शेतीविषयी त्यांची उत्सुकता वाढत गेली आणि त्याच्या मनात आलं की आपण देखील आपल्या शेतात ड्रॅगन फूडची लागवड केली पाहिजे.
मग काय या संदर्भात त्यांनी संबंधित व्हिडिओ मधील व्यक्तीला संपर्क केला आणि ड्रॅगन फूड जळगाव जिल्ह्यातील वातावरणात येईल की नाही या संदर्भात विचारणा केली. त्या व्यक्तीने सांगितले की, लागवड करून पहा पहिल्या वर्षी थोडा फार खर्च लागेल परंतु उत्पन्न चांगलं निघेल.
मग त्यांनी थोडा विचार केला सांगोल्यातील आणि बामणे गावातून 25 रुपयाला एक ड्रॅगनफ्रुट स्टेम या प्रमाणे ड्रॅगन फ्रुटचे स्टेम आणले. त्यानंतर दोन महिन्यापर्यंत त्या पासून रोप तयार केले. त्यानंतर जून 2021 मध्ये सिमेंटचे पोल उभे करून ड्रॅगन फ्रुट शेतीसाठी आवश्यक स्ट्रक्चर तयार केले. प्रत्येक पोल चार रोप लागवड केली. रोपांची जसं-जशी वाढ होत होती तसतशे दोरीच्या साह्याने पोलला स्टेप बाय स्टेप रोपाला बांधण्यात आले.
पोलच्या वरील टोकपर्यंत वाढ झाल्यानंतर सळई व मोटरसायकलचा टायर बांधून स्ट्रक्चर तयार करण्यात आले. ऑगस्ट 2022 ला फुलधारणा आणि फळधारणा कुठे-कुठे सुरू झाली. नंतर बऱ्यापैकी फळ मोठे झाले. ज्या ठिकाणाहून रोपे आणले त्यांनी सांगितलं होतं की 24 महिन्यात फळ येतील परंतु सुखदेव यांनी लागवड केलेल्या ड्रॅगन फ्रुट पिकाला बारा महिन्यातच फळ येण्यास सुरुवात झाली. ड्रॅगन फुडला रासायनिक खत वगैरे काहीच दिलेल नाही मात्र सेंद्रिय खते देण्यात आली आहेत.
सुखदेव यांनी आपल्या 27 गुंठे शेत जमिनीवर ड्रॅगन फ्रुटची शेती केली असून ते सेंद्रिय पद्धतीने ड्रॅगन फ्रुट उत्पादित करीत आहेत. निश्चितच सुखदेव यांनी शेतीमध्ये क्रांती घडवली आहे. सुखदेव यांना शेतीमध्ये त्यांचे बंधू सोपान यांचा कायमच पाठिंबा राहिला आहे.
या दोन्ही बंधूंनी खानदेशच्या मातीवर केलेला हा अभिनव उपक्रम इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. खरं पाहता अहमदनगर जिल्ह्यात तसेच नासिक मध्ये शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर, व्यावसायिक तत्त्वावर ड्रॅगन फ्रुट लागवड यशस्वी करून दाखवली आहे.
मात्र खानदेश म्हणजेच धुळे नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यांचा विचार केला असता या ठिकाणी अजूनही ड्रॅगन फ्रुट लागवडीकडे शेतकऱ्यांनी आगेकूच केलेली नाही. मात्र या कोळी बंधूंनी आता याची सुरवात केली असून येत्या काळात ड्रॅगन फ्रुटची शेती खानदेश मध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.